जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूंच्या प्रमाणात पुन्‍हा वाढ; दिवसभरात ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह

नाशिक : जिल्ह्या‍त कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात पुन्‍हा एकदा वाढ झालेली आहे. बुधवारी (ता. १६) जिल्ह्यात तब्‍बल ११ कोरोनाबाधितांचा बळी गेला. दिवसभरात ४०७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४४० राहिली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ४४ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्या‍त तीन हजार ३५६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरात सात मृत

बुधवारी (ता. १६) झालेल्‍या ११ मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील तब्‍बल सात रुग्णांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील चार रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. मृतांमध्ये नऊ पुरुष, तर दोन महिला रुग्‍ण असून, पाच रुग्‍ण वयाच्‍या सत्तरीपुढील आहेत. नाशिक शहरातील म्‍हसरूळ, सिडको, जुना गंगापूर नाका, अमृतधाम, अशोकनगर (सातपूर), दिंडोरी रोड येथील रुग्णांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील दोन सिन्नरचे, एक येवला, तर एक निफाडच्‍या रुग्णाचा मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्या‍तील एकूण मृतांचा आकडा एक हजार ८८६ झाला आहे. दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २१८, नाशिक ग्रामीणमधील १७७, मालेगावचे आठ, तर जिल्ह्याबाहेरील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २८५, नाशिक ग्रामीणमधील १०५, मालेगावचे ३२, तर जिल्ह्याबाहेरील १८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

एक लाख ९१८ बाधितांची कोरोनावर मात

दरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख सहा हजार १६० झाली असून, यांपैकी एक लाख ९१८ बाधितांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात ७५२, नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ४१, मालेगावला पाच, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा, तर जिल्‍हा रुग्णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ८३४ अहवाल प्रलंबित होते. यांपैकी ५८५ अहवाल नाशिक शहरातील असून, १८१ अहवाल नाशिक ग्रामीणचे, तर मालेगावच्‍या ६८ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा होती

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ