जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; साडेसहाशे बूथ उभारणार 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक लाखाहून अधिक झालेली असताना, प्रत्‍येकाला कोरोना लसीकरण उपलब्‍धतेबाबत उत्‍सुकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर यांनी शनिवारी (ता. १९) सादरीकरणाद्वारे लसीकरण मोहिमेची माहिती दिली. तर जिल्‍हा प्रशासनातर्फे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी तयारीबाबतचा आढावा घेतला. 

रोज सुमारे साठ हजार नागरिकांना लस

जिल्ह्यात कोरोनाच्‍या लसीकरणासाठी सुमारे साडेसहाशे बूथ उभारले जातील. प्रत्‍येक बूथवर पाच जणांची टीम कर्तव्‍य बजावेल. प्रत्‍येक बूथवर रोज शंभर याप्रमाणे जिल्ह्यात रोज सुमारे साठ हजार नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्‍ध असेल. कोविड- १९ लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी केली असून, प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. लशींची उपलब्‍धता झाल्‍यास तातडीने मोहिमेला सुरवात केली जाणार असल्‍याचे सांगण्यात आले. 

विभागात एकाच कंपनीची लस असावी 

येत्या काही महिन्यांत उपलब्ध होणाऱ्या कोविड लशीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लशींची निर्मिती केली जात आहे. लस देण्याचे प्रमाण व पद्धतीदेखील वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मांढरे यांनी व्‍यक्‍त केली. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

तीन कक्षांतून प्रक्रिया 

नोंदणीकृत व्‍यक्‍तींनी लसीकरण बूथवर उपस्‍थिती नोंदविल्‍यानंतर त्‍यांच्‍या कागदपत्रांची तपासणी प्रवेशावेळी केली जाईल. यानंतर बूथवर नियुक्‍त अधिकारी ओळखपत्र व अन्‍य पडताळणी करतील. यानंतर संबंधितांना प्रतीक्षा कक्ष (वेटिंग रूम) येथे बसविले जाईल. शारीरीक अंतर ठेवताना क्रमांकानुसार नागरिकांना लसीकरण कक्षात (व्‍हॅक्सिनेशन रूम) सोडले जाईल. तेथे लसीकरणाचा डोस दिल्‍यानंतर पुढील टप्प्‍यात संबंधितांना निरीक्षण कक्ष (ऑब्‍‍जरव्‍हेशन रूम) मध्ये काही काळ बसावे लागेल. यादरम्‍यान काही त्रास उद्‌भवल्‍यास उपचारासाठी प्रणाली उपलब्‍ध असेल. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

अशी असेल मोहीम 

* लसीकरणासाठी को-विन ॲपवर करावी लागेल नोंदणी 
* राज्‍यस्‍तराच्‍या धर्तीवर जिल्‍हास्‍तरावर टास्‍क फोर्सचे असेल मोहिमेवर नियंत्रण 
* बूथवर कागदपत्रांच्‍या पडताळणीनंतर दिली जाईल लस 
* जिल्ह्यात शक्‍यतो एकाच कंपनीच्‍या लसीच्या वापरावर असेल भर 
* लस प्राप्त झाल्‍यापासून बूथवर पोचेपर्यंत विशेष कोल्‍डचेनची निर्मिती 
* कंपनीनुसार ०.१ एमएल ते ०.५ एमएलचा असेल लसीचा डोस 
* ठराविक दिवसांच्‍या अंतराने एकूण दोन वेळा घ्यावी लागेल लस 
* पहिली लस घेतल्‍यानंतर दुसऱ्यांदा लसीसाठी नोंदणीकृत मोबाईलवर पाठविला जाईल मेसेज 
* ऑटोडिस्‍पोझल सिरींजमुळे एका व्‍यक्‍तीस वापरानंतर सिरींज केली जाईल नष्ट