जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे काम समाधानकारक – पालकमंत्री भुजबळ

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे काम समाधानकारक 
पालकमंत्री भुजबळ ः पोलीस मुख्यालयात कोरोना आढावा बैठक संपन्न 

नाशिक : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचे काम समाधानकारक आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात ज्यावेळी नागरिकांचे लसीकरण होईल त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे 
लसीकरण होण्यासाठी अधिसंख्य केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

नव्याने 10 केंद्राची उभारणी

लसीकरणाच्या सुरवातीला लस घेतांना अनेकांच्या मनात भिती होती. परंतु हळूहळू भिती दूर होऊन लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी पुढे येत असून आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचे काम 74 टक्के झाले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा देखील लवकर सुरु होणार असून नव्याने 10 केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 
जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होतानाचे दिलासदायक चित्र आहे. त्यामुळे आवश्यकता नसलेले कोविड सेंटर बंद करुन आवश्यकता भासल्यास एका दिवसात यंत्रणा उभी करता येईल असे नियोजन आरोग्य विभागाने ठेवण्याबाबतची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. 

 हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

सुरु होणाऱ्या शाळांना चांगला प्रतिसाद मिळेल...

फायर ऑडीटबाबत सर्व दवाखान्यांचा अहवाल एकत्र करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याबाबतचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना प्राधान्याने वीजे संदर्भातील दुरुस्त्या व पुरेशा पाण्याच्या टाक्यांचे नियोजन करावे. तसेच वर्षातून एकदा मॉकड्रिल 
राबवून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी बैठकित सांगितले. शासनाच्या सूचनेप्रमाणे 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरु होत आहे. याआधी 9 वी ते 10 वी चे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्याला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला असून आज प्रत्येक वर्गात 
80 टक्के उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे सुरु होणाऱ्या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळेल असे मत पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 

पोलीस मुख्यालयाच्या भिष्मराज सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकित पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डे्य, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.