जिल्ह्यात दिवसभरात पंधरा जणांचा मृत्‍यू; अठरा वर्षीय युवकाचाही समावेश

नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंच्या प्रमाणात मंगळवारी वाढ झाली असून, दिवसभरात कोरोनामुळे १५ बाधितांचा बळी गेला. यात, अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. नाशिक ग्रामीणमधील नऊ व शहरातील सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकट्या नांदगाव तालुक्‍यातील चार बाधितांचा त्यात समावेश आहे. दिवसभरात दोन हजार ६४४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले, तर बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या दोन हजार ३९३ होती. जिल्ह्यात सध्या १७ हजार २२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात दोन हजार ६४४ पॉझिटिव्ह; बरे झाले दोन हजार ३९३ रुग्‍ण

मंगळवारी नांदगाव येथील ६५ वर्षीय व ८४ वर्षीय महिला, मनमाड येथील ६६ वर्षीय व ६५ वर्षीय पुरुष बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला, तर पिंपरवाडी येथील ७१ वर्षीय पुरुष, दिंडोरी तालुक्‍यातील ६० वर्षीय महिला, सिन्नरमधील ५५ वर्षीय महिला, इगतपुरीतील १८ वर्षीय पुरुष, तर पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील ७५ वर्षीय महिला बाधिताचा मृत्‍यू झाला. नाशिक शहरातील मुंबई नाका येथील ७० वर्षीय, वडनेर रोडवरील ७२ वर्षीय, पंचवटीतील ७२ वर्षीय महिला, ७४ वर्षीय पुरुष, अंबड येथील ६२ वर्षीय पुरुष, महात्‍मानगर येथील ८३ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला. दिवसभरात नाशिक शहरातील एक हजार ४८०, नाशिक ग्रामीणमधील ८२७, मालेगाव येथील २५९, जिल्ह्याबाहेरील ७८ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ६६३, नाशिक ग्रामीणमधील ५११, मालेगावचे १८०, जिल्ह्याबाहेरील ३९ रुग्‍ण आहेत.
 
चार हजार ८०६ अहवाल प्रलंबित

सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार ८०६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक दोन हजार ५८२ अहवाल नाशिक ग्रामीणचे होते. शहरातील एक हजार ४५६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दोन हजार ६४२ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यांपैकी नाशिक महापालिका हद्दीतील दोन हजार ४५५ रुग्‍णांचा समावेश होता, तर जिल्‍हा रुग्‍णालयात सात, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ रुग्‍ण दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणमधील १२३, तर मालेगावमध्ये ४९ रुग्‍णांचा यात समावेश आहे.