जिल्ह्यात नवीन २२५ अंगणवाड्या; अंगणवाडीसेविका-मदतनीस भरतीस परवानगी 

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून, जिल्ह्यात लवकरच नव्याने २२५ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी आहेर यांनी ही माहिती दिली. 
शुक्रवारी (ता. ५) झालेल्या समितीच्या सभेत त्या बोलत होत्या.

जिल्ह्यात नवीन २२५ अंगणवाड्यांना मंजुरी   

जिल्ह्यात आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रात पाच हजारांहून अधिक अंगणवाड्या आहेत. मात्र यातील अनेक अंगणवाड्या उघड्यावर किंवा समाजमंदिरात भरतात. अशा अंगणवाड्यांना हक्काची इमारत मिळावी म्हणून जिल्हा नियोजन समितीत अंगणवाडी बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीमध्ये जिल्ह्यात २२५ नवीन अंगणवाडी केंद्र इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार आदिवासी क्षेत्रामध्ये नवीन १५९, तर बिगरअदिवासी क्षेत्रात ६६ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. गणेश अहिरे, कविता धाकराव, रेखा पवार, सुनीता सानप, कमल आहेर, गितांजली पवार-गोळे, शोभा बरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

जिल्ह्यात ३३४ तीव्र कुपोषित बालके 
बैठकीत जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा देखील आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्यात जानेवारी २०२१ अखेर एक हजार ९५७ मध्यम कुपोषित, तर ३३४ तीव्र कुपोषित बालके असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल
 
अंगणवाडीत १,३२८ पदे रिक्त 
जिल्ह्यात अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका मिळून एक हजार ३२८ पदे रिक्त आहेत. यात अंगणवाडी सेविकांची २४१, अंगणवाडी मदतनीस- ९६४ व मिनी अंगणवाडी सेविकांची २३ रिक्त पदे आहेत. भरतीप्रक्रिया राबविण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार अंगणवाडीसेविका- मदतनीस भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेशही श्रीमती आहेर यांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले.