जिल्ह्यात पुन्‍हा कोरोनाचा भडका! दिवसभरात ६४५ पॉझिटिव्‍ह, सहा मृत्‍यू 

नाशिक  : जिल्ह्यात पुन्‍हा एकदा कोरोनाचा फैलाव वाढला असून, उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या पुन्‍हा एकदा चार हजारांच्‍या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. शनिवारी (ता. ६) दिवसभरात तब्‍बल ६४५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. सहा बाधितांचा जिल्ह्यात मृत्‍यू झाला असून, सर्व मृत साठ वर्षांपुढील आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३६४ होती. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २७५ ने वाढ झालेली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात तीन हजार ७०९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील सर्वाधिक ४०६ बाधित असून, नाशिक ग्रामीणमधील १६३, मालेगाव येथील ५२, तर जिल्ह्याबाहेरील २४ रुग्‍ण आहेत. सहा मृतांमध्ये नाशिक ग्रामीणमधील चार, तर नाशिक महापालिका हद्दीतील दोघा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमधील ६७ वर्षीय पुरुष, सिन्नरमधील ६५ वर्षीय महिला, निफाड येथील ७५ वर्षीय पुरुष व ६७ वर्षीय पुरुष बाधिताचा कोरोनामुळे बळी गेला आहे. नाशिक शहरात पंचवटीतील ७७ वर्षीय पुरुष, टांकसाळ लेन येथील ७० वर्षीय पुरुष बाधिताचाही मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १७८, नाशिक ग्रामीणमधील १६२, मालेगावचे चार, तर जिल्ह्या‍बाहेरील वीस रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

जिल्ह्यात दिवसभरात आढळलेल्‍या संशयित रुग्‍णांच्‍या संख्येतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात एक हजार १११ संशयित रुग्‍णालय व गृहविलगीकरणात दाखल झाले आहेत. यापैकी एक हजार ७१ रुग्‍ण नाशिक महापालिका हद्दीतील, तर सात रुग्‍ण जिल्‍हा रुग्‍णालयात, तिघे डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ५२४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

दरम्‍यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख २५ हजार ३३२ झाली असून, यापैकी एक लाख १९ हजार ४९० रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार १३३ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल