जिल्ह्यात २ दिवसांत कोरोनाचे चाळीस बळी! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या 30 हजारांच्‍या उंबरठ्यावर 

नाशिक, : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंताजनक होत चालला असून, ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या तीस हजारांच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अठरा, तर शनिवारी दिवसभरात २२ बाधितांचा असे दोन दिवसांत एकूण चाळीस बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. तर तीन हजार ९९५ आणि चार हजार ३३४, असे एकूण आठ हजार ३२९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अनुक्रमे तीन हजार ५४ आणि तीन हजार ९८ राहिली. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात २९ हजार ४४५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

शुक्रवारी (ता.२) जिल्ह्यात झालेल्‍या अठरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सहा, नाशिक ग्रामीणमधील आठ, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तीन, तर जिल्‍हाबाहेरील एका बाधिताचा समावेश होता. शनिवारी (ता. ३) झालेल्‍या २२ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणमधील दहा, मालेगावचे तीन व जिल्‍हाबाहेरील एका बाधिताचा समावेश आहे. मृतांमध्ये बहुतांश बाधित ज्‍येष्ठ नागरिक असले तरी कमी वयातील बाधितही कोरोनाचे शिकार होत आहेत. पंचवटीतील फुलेनगरमधील ३२ वर्षीय, तसेच शहरातील २८ वर्षीय युवकासह झोडगे (ता. मालेगाव) येथील ३८ वर्षीय युवकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ३०५, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ५१३, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ११६, जिल्‍हाबाहेरील ६१ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. शनिवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार ४०१, नाशिक ग्रामीणमधील एक हजार ७६८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ९१, तर जिल्‍हाबाहेरील ७४ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

सहा हजारांहून अधिक अहवाल प्रलंबित 

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्यातील सहा हजार १२३ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील सर्वाधिक तीन हजार २०, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ६८७, मालेगावच्‍या ४१६ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. दिवसभरात चार हजार ३०६ रुग्‍ण जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार ५४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २२, नाशिक ग्रामीणमध्ये १८०, मालेगावला ४५ रुग्‍ण दाखल झाले आहेत. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

जिल्ह्यात दीड लाख रुग्‍ण कोरोनामुक्‍त 

जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्‍या एक लाख ९३ हजार ६३५ कोरोनाबाधितांपैकी एक लाख ६१ हजार ७४३ रुग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. नाशिक शहरात आढळलेल्‍या एक लाख २१ हजार ६०६ बाधितांपैकी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा गाठला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील एक लाख दोन हजार ६०६ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. नाशिक ग्रामीण भागात आढळलेल्‍या ६० हजार ८१७ पैकी ५० हजार ३४ रुग्‍णांनी कोरोनाचा पराभव केला आहे.