जिल्ह्यात ॲक्टिव्ह रूग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर; दिवसभरात १ हजार ३७६ पॉझिटिव्‍ह

नाशिक : जिल्ह्यात गेल्‍या महिन्याभरापासून आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्‍याने वाढ होत आहे. रोज आढळणाऱ्या बाधितांच्‍या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्‍णांच्या संख्येत मोठी तफावत असल्‍यामुळे, उपचार घेत असलेल्‍या म्हणजेच ॲक्‍टिव्ह रुग्‍णांच्या संख्येतही वाढ होत असून, ही संख्या पुन्हा दहा हजारांच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. सोमवारी (ता. १५) दिवसभरात १ हजार ३७६ पॉझिटिव्‍ह आढळले असून, ५५१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. तर, जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत ८१९ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ८ हजार ८६७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

गेल्‍या १७ फेब्रुवारीला जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या १ हजार १८२ पर्यंत पोचली होती. मात्र, त्‍यानंतर बाधितांची संख्या सातत्याने वाढत गेली. आता सक्रिय कोरोना बाधितांची संख्या दहा हजारांच्‍या उंबरठ्यावर पोचली आहे. सोमवारी नाशिक महापालिका हद्दीतील ७८८, नाशिक ग्रामीणमधील ४०७, मालेगाव येथील १४९, जिल्‍हा बाहेरील ३२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २४४, नाशिक ग्रामीणमधील २२०, मालेगावच्‍या ६३, तर जिल्‍हा बाहेरील २४ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्‍यू झाला असून, यापैकी प्रत्‍येकी तीन नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातील आहेत. शहरात वडाळा परिसरातील ६५ वर्षीय महिला, कामटवाडा येथील ७२ वर्षीय पुरुष, राजीवनगर येथील ९१ वर्षीय पुरुष, तसेच ग्रामीणमध्ये मेंढी (ता. सिन्नर) येथील ७० वर्षीय, लासलगाव (ता. निफाड) येथील ४८ वर्षीय आणि मनमाड (ता. नांदगाव) येथील ७१ वर्षीय बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

२ हजार ७९२ अहवाल प्रलंबित 

सायंकाळी उशीरापर्यंत २ हजार ७९२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक शहरातील १ हजार ५१९ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. दरम्‍यान, दिवसभरात जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ३०८ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील १ हजार २१९ रुग्‍ण असून, जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ रुग्‍ण दाखल झाले आहेत. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर