जिल्ह्यासाठी ‘कोव्हिशील्ड’चे ४३ हजार ४४० डोस उपलब्ध – सूरज मांढरे

नाशिक : कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी तयार केलेली लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० डोस उपलब्ध झाले आहेत. महापालिका व ग्रामीण भागातील एकूण १६ केंद्रांवर शनिवार (ता.१६)पासून लसीकरणास सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

आत्तापर्यंत एक हजार २९ लसटोचकांना प्रशिक्षण

जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खासगी संस्थांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एक हजार २९ लसटोचकांना प्रशिक्षण दिले आहे. लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध आहेत. प्रतिबंधात्मक उपायांमुळे आजाराची व्याप्ती जिल्ह्याच्या केवळ एक ते दीड टक्के लोकसंख्येपुरतीच मर्यादित ठेवण्यात यश आले असून, लसीकरणामुळे एक जास्त सक्षम सुरक्षाकवच मिळणार आहे. हे सुरक्षाकवच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने तयार असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. 

पाच टप्प्यांत लसीकरण प्रक्रिया

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की पाच टप्प्यांत लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. यात प्रथम पूर्वनोंदणी, शरीराचे तापमान तपासणी, पडताळणी, लसीकरण, निरीक्षण अशी प्रक्रिया असेल. ते म्हणाले, की लसीकरण केंद्रावर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने बुधवारी (ता.१३) प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोचविण्यात आल्या. निवडलेल्या संस्थांसाठी नोडल अधिकारी, प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके बनविण्यात आली आहेत. या पथकांनी लसीकरणादरम्यान मास्क व ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य आहे. 

लाभार्थ्याला सहा फुटांच्या सोशल डिस्टसिंग

कोविड लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था केली असून, पहिल्या वेटिंग रूममध्ये लाभार्थ्याला सहा फुटांच्या सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून बसण्याची व्यवस्था असेल. प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेऊन सॅनिटाइज केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थ्याची ओळखपत्रानुसार CoWin aap वर नोंद घेऊन लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर लसीकरण होईल. लसीकरणानंतर निरीक्षणासाठी तिसऱ्या रूममध्ये लाभार्थ्याला ३० मिनिट बसविण्यात येणार आहे. या तिन्ही रूममध्ये कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. 

१६ केंद्रांवर लसीकरण 

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय (नाशिक), सामान्य रुग्णालय (मालेगाव), उपजिल्हा रुग्णालय (कळवण), उपजिल्हा रुग्णालय (निफाड), उपजिल्हा रुग्णालय (चांदवड), उपजिल्हा रुग्णालय (येवला), ग्रामीण रुग्णालय (दिंडोरी), प्राथमिक आरोग्य केंद्र (सिद्धपिंप्री ता. नाशिक), इंदिरा गांधी हॉस्पिटल (नाशिक), शहरी आरोग्य केंद्र (सातपूर, नाशिक), शहरी आरोग्य केंद्र (नवीन बिटको, नाशिक), शहरी आरोग्य केंद्र जेडीसी बिटको (नाशिक), शहरी आरोग्य केंद्र (कॅम्प वॉर्ड, मालेगाव), शहरी आरोग्य केंद्र (निमा १, मालेगाव), शहरी आरोग्य केंद्र (रमजानपुरा, मालेगाव), शहरी आरोग्य केंद्र (सोयगाव, मालेगाव) अशी महापालिका व ग्रामीण भाग मिळून एकूण १६ ठिकाणी लसीकरणासाठी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. 

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

आकडे बोलतात 
डोसची विभागणी 

एक लाख ३२ हजार 
नाशिक विभाग 

४३ हजार ४४० 
नाशिक 

३९ हजार २९० 
नगर 

१२ हजार ४३० 
धुळे 

२४ हजार ३२० 
जळगाव 

१२ हजार ४१० 
नंदुरबार  

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले!