जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार

जिल्हा परिषद www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात, अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेच्या सोबत काम करावे. उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांची नोंद घेण्यात येऊन राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी केले.

जिल्हा परिषदेतर्फे सामाजिक संस्था आणि औद्योगिक संस्था यांची संयुक्त बैठक निवेक क्लब येथे घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने काम करू इच्छिणार्‍या सामाजिक संस्थांनी पुढे येत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर यासंदर्भात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार 75 सामाजिक व 25 औद्योगिक संस्थांची बैठक ही मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी जिल्हा परिषदेबद्दल माहिती देऊन या आधी जिल्हा परिषदेसोबत काम केलेल्या संस्था व त्यांच्या कामांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना सर्वच विभागांमध्ये काम करण्यास वाव असल्याचे सांगितले. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी आपल्या विभागांबद्दल माहिती देत सामाजिक संस्थांना आपल्या विभागाशी निगडित कुठे काम करण्याची संधी आहे याबद्दल सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी या बैठकीत आपल्या विभागांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर सामाजिक व औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनीदेखील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या संकल्पना मांडल्या. या बैठकीस 75 सामाजिक संस्था व 25 औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यावेळी अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार appeared first on पुढारी.