”जीव धोक्यात घालून सेवा केलेल्याचे हेच फळ?”; डॉक्टरांनी मांडल्या व्यथा 

नाशिक : कोरोना काळात जीव धोक्यात घालून दिवसरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना वेळेवर वेतनच मिळत नसल्याचे समोर आले आहे. पैसेच नसल्याने कौटुंबिक कारणांनी त्रस्त झालेल्या डॉक्टरांनी अखेर गुरुवारी (ता.२८) आरोग्य उपसंचालकांना निवेदन देत व्यथा मांडल्या. 

डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप
वैद्यकीय अधिकारी संघटनेने यासंदर्भात निवेदन दिले असून, कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी कार्यरत डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबीयांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. विलंबात हळूहळू वाढदेखील होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. गांडाळ यांना निवेदन दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्वत्र कोविडयोद्धा म्हणून गौरवले जाते. एकीकडे सन्मान दिला जात असताना दुसरीकडे वेतनाची परवड केली जात असल्याची भावना डॉक्टरांनी मांडली. यामुळे कौटुंबिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

जीव धोक्यात घालणाऱ्या कोरोनायोद्ध्यांना वेतनच नाही 

दरम्यान, डॉक्टरांच्या संतप्त भावना लक्षात घेता याप्रकरणी पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. युवराज देवरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. पंकज जाधव, डॉ. अनंत पवार, डॉ. गिरीश देवरे, डॉ. तुषार देवरे आदी मॅग्मोचे पदाधिकारी उपस्थित होते.  

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल