जुना वाडा भस्मसात करण्याचा डाव? आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात 

नाशिक : जुनी तांबटगल्लीतील बंद जगदाने वाड्यास आग लागण्याची घटना गुरुवार (ता.४) सकाळी घडली. वाडा आतून पूर्णपणे जळाला असून, कुणी तरी घातपात केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

जुना वाडा भस्मसात करण्याचा डाव?

सुनील जगदाने यांचा तांबट गल्लीत जुनावाडा आहे. गुरुवारी सकाळी बंद वाड्यातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यांनी जगदाने कुटुंबीयांस माहिती दिली. अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत वाड्यातील संसार उपयोगी वस्तूंसह आतील पूर्ण भाग जळून राख झाला. दोन वर्षापासून वाडा बंद होता, वीजपुरवठा नव्हता. असे असताना आग लागली कशी, अशा प्रकारचे प्रश्‍न नागरिकांना पडत होते. घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे.

जळते सिगारेट फेकल्याने आग लागण्याची नोंद

परिसरातील काही नागरिकांनी चार जणांना वाड्याच्या मागील बाजूने जात असल्याचे पाहिले होते. त्यांनीच तर तो प्रकार केला नसावा ना, अशी चर्चा होती. तर पोलिस ठाण्यात कुणीतरी जळते सिगारेट फेकल्याने आग लागण्याची नोंद केली आहे. जगदाने वाड्यास लागून अनेक जुने वाडे आहे. वेळेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. काही दिवसापासून कामगार त्या वाड्यातील स्वच्छतेचे काम करताना दिसत होते. गुरुवारी ते कामगारही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. दोन वर्षापासून वाडा बंद अवस्थेत असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. भद्रकाली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 

आगीचे कारण गुलदस्त्यात 
जगदाने कुटुंबीयांचा कुणावर संशय नाही. वाडे माफियांकडून तर तसा प्रकार घडवून आणला नसावा ना, असे प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केले. तर, पोलिसांत सिगारेटमुळे आग लागल्याचे नोंदणी आहे. दरम्यान, काही दिवसांपासून काही नशेबाजांचा वावर त्याठिकाणी दिसून आल्याचे रहिवाशांनी सांगितले. यामुळे आग लागण्याच्या कारणांचे गूढ वाढले आहे. 

अरुंद गल्यांची अडचण 
जुने नाशिक भागातील गल्या अतिशय अरुंद आहे. मोठे वाहन जाण्यास अडचण येत असते. अग्निशमन विभागाच्या पथकास याच अडचणींचा सामोरे जावे लागले. तरी देखील त्यांनी कसरत करत वाहन घटनास्थळी नेत आगीवर वेळेत नियंत्रण मिळविले.