जुनी पाठ्यपुस्तके आता रद्दीऐवजी पुन्हा दप्तरात! होणार कोट्यवधी रुपयांची बचत

येवला (नाशिक) : वर्ष सुरू झाले की नवेकोरे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसते आणि वर्ष संपले की हीच पाठ्यपुस्तके रद्दीत गेलेली पाहायला मिळतात... मात्र हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पाठ्यपुस्तकांची पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार असून, जिल्ह्यातील सुमारे लाखांवर पुस्तके यामुळे पुन्हा वापरात येऊन कोट्यवधी रुपयांची बचत होऊ शकणार आहे. 

एक कोटी २० लाखांच्या आसपास पुस्तकांचे वाटप

सर्वशिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या, तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागचा हेतू आहे. या योजनेत राज्यभरात सुमारे एक कोटी २० लाखांच्या आसपास पुस्तकांचे वाटप होते, तर यासाठी दोनशे कोटींवर खर्च दर वर्षी येतो. एकट्या नाशिक जिल्ह्यातच जिल्हा परिषद व महापालिकांच्या मिळून किमान पाच लाख ५० हजारांच्या आसपास पुस्तकांचे वाटप होऊन त्यासाठी दहा कोटींवर खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरला तर दोन ते तीन वर्षे सहजपणे तो उपयोगात येतो. मात्र, यापूर्वी या पुनर्वापरावर विशेष लक्ष न दिल्याने दर वर्षी नवे पुस्तके वाटप करण्याची योजना सुरू आहे.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

पुनर्वापर करण्याचा निर्णय

पुस्तक वापरले की अनेक विद्यार्थी ते रद्दीतही विकत असल्याचे चित्र होते. आता यावर शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकाचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी हा यामागचा उद्देश आहे. दरम्यान, २०१७ मध्ये भाजप सरकारने पुस्तकांऐवजी त्याचा निधी थेट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या योजनेला अपयश आल्याने पुन्हा पुस्तके पूर्वीप्रमाणेच वाटप होत आहेत. 

पर्यावरणप्रेमींकडून  उपक्रमाचे स्वागत

यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांत पैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे, अशी पुस्तके संकलित करून पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार असून, शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिली आहे. या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील, तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. अर्थात‌ पर्यावरणप्रेमींकडून मात्र या उपक्रमाचे स्वागत होत असून, विद्यार्थ्यांनीदेखील पाठ्यपुस्तकांचा योग्य पद्धतीने वापर करून ती शाळेत जमा करावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

 

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने शासनाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्यास नक्कीच अनेक पाठ्यपुस्तकांचा पुन्हा वापर होऊ शकेल. पर्यावरण संवर्धनासह कागदाची व शासन निधीची यातून बचत होऊ शकेल. 
-सुरेखा दराडे, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, नाशिक