जुन्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश करा; महापौरांकडून प्रशासनाला सूचना

नाशिक : आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर काम करताना जुन्या अंदाजपत्रकातील कामांचा समावेश न केल्यास अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच अपूर्ण राहिलेली कामे नवीन अंदाजपत्रकातून वगळल्यास महासभेचा अवमान समजला जाईल, असा इशारा महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला. 

महापौरांकडून प्रशासनाला सूचना

महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रक सादर केले जाते. त्यापूर्वी अंदाजपत्रकीय कामाला महासभेची मंजुरी आवश्‍यक असते. त्यानुसार महापालिकेच्या ऑनलाइन महासभेत २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या सादरीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांनी नगरसेवकांना विकास निधी देताना दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. कोरोनामुळे गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातील कामे न झाल्याने पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये त्या कामांचा समावेश करण्याची मागणी भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली. त्यानुसार महापौर कुलकर्णी यांनी मागील वर्षाच्या अंदाजपत्रकातील न झालेल्या कामांचा समावेश पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात समाविष्ट करावा, अन्यथा महासभेचा अवमान केला, म्हणून कारवाईचा इशारा दिला. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

क्रीडा शिष्यवृत्ती समितीत लोकप्रतिनिधी 

दरम्यान, महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीचे महापौर क्रीडा शिष्यवृत्ती नामकरण केले असून, क्रीडा शिष्यवृत्ती समितीमध्ये महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय गटनेत्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रीडा छाननी समितीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.  

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना