जेईई मेन्‍स परीक्षेवर कोरोनाचे सावट! ‘एनटीए’तर्फे २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षेची तयारी   

नाशिक : राज्‍यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विविध परीक्षा यामुळे प्रभावित होत आहेत. नुकतीच एमपीएससीपाठोपाठ दहावी-बारावीच्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्‍या आहेत. यातून आता नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट आहे. येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान परीक्षा घेण्याचे नियोजित असून, कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे व लॉकडाउन जाहीर झाल्‍यास अशा परिस्‍थितीत विद्यार्थी परीक्षा देणार कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. 

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी ‘एनटीए’मार्फत जॉइंट एन्‍ट्रान्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स व नंतर जेईई ॲडव्हान्स्ड या परीक्षेच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जातो. ‘एनटीए’तर्फे शैक्षणिक वर्षात दोनवेळा ही परीक्षा घेतली जात असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्‍या चार संधी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. त्‍यानुसार फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा पार पडल्या आहेत, तर एप्रिल व मेमध्ये उर्वरित दोन प्रयत्‍न विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. सध्याच्‍या परीस्‍थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, परिस्‍थिती चिंताजनक आहे. अशा परिस्‍थितीत विविध परीक्षा स्‍थगित केल्‍या जात आहेत. अशातच येत्‍या २७ ते ३० एप्रिलदरम्‍यान नियोजित असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेवरही कोरोनाचे सावट असणार आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे लक्ष 

अन्‍य विविध परीक्षा अधिकारात असल्‍याने राज्‍य शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्णय जाहीर केले आहेत. परंतु जेईई मेन्‍स परीक्षा राष्ट्रीय स्‍तरावर घेतली जात असल्‍याने, परीक्षा स्‍थगित करण्यासंदर्भात राज्‍य शासनाला केंद्रीय मंत्रालय, एनटीए यांच्‍याकडे यासंदर्भातील भूमिका नोंदविणे आवश्‍यक आहे. अद्याप परीक्षेचे प्रवेशपत्र ‘एनटीए’तर्फे उपलब्‍ध करून दिलेले नाही. त्यातच राज्‍य शासनाच्‍या भूमिकेकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

विद्यार्थ्यांची भिस्‍त ऑनलाइन अभ्यासावर 

सध्या क्लासेस बंद असले तरी ऑनलाइन व्‍यासपीठाद्वारे क्‍लासेसकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना महामारीमुळे निर्बंध आल्‍याने विद्यार्थ्यांची सर्व भिस्‍त ऑनलाइन शिक्षणावरच आहे.  

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू