जेवणानंतर शतपावली बेतली तरुणाच्या जीवावर; तरुण मुलाचा कुटुंबीयांना शोक आवरेना

सिन्नर (जि.नाशिक) : ​जेवणानंतर शतपावली करण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तरुणावरच काळाचा घाला आला. २० वर्षाच्या तरुण मुलाच्या या बातमीने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

जेवणानंतर शतपावली बेतली तरुणाच्या जीवावर

प्रतीक प्रभाकर बेलोटे (वय २०) असे मृताचे नाव असून, तो पत्रकार तथा वृत्तपत्र वितरक प्रभाकर बेलोटे यांचा चिरंजीव होत. प्रतीक जेवणानंतर नेहमीप्रमाणे मित्रांसमवेत वावी रस्त्याने शतपावली करण्यासाठी गेला होता. रवींद्र चतुर यांच्या फर्निचर दुकानानजीक ते पोचले असता वावीकडे जाणाऱ्या ॲपेरिक्षाने (एमएच- २३- एएच- ६७४२) प्रतीकला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

मद्यधुंद रिक्षाचालक पोलीसांच्या ताब्यात

जेवणानंतर शतपावली करण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या तरुणाचा ॲपेरिक्षाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास पंचाळे येथे घडली. घटनेनंतर पलायन केलेल्या मद्यधुंद रिक्षाचालकाला नागरिकांनी मिठसागरे परिसरात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, उपचारांपूर्वीच प्रतीकचा मृत्यू झाल्याने बेलोटे कुटुंबावर शोककळा पसरली. सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पंचाळे येथे सोमवारी (ता. ५) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. उमेश मालपाणी यांच्या फिर्यादीवरून रिक्षाचालक संदीप विश्‍वनाथ ठोंबरे (वय ३०, रा. साकुरी, ता. राहता) याच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.  

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी