जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला ‘कोरोनाबाधित’..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

विंचूर (जि.नाशिक) : निफाड तालुक्यातील अवघ्या बोटांवर मोजणारी गावे सोडली तर गावागावांत रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीही बहुतांश नागरिक काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. विंचूरच्या लसीकरण केंद्रावर कोरोनाबाधित रुग्ण लसीकरणाला आल्याचा प्रकार घडल्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. काय घडले नेमके? 

लसीकरण केंद्रावर पोचला कोरोनाबाधित 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनही हतबल झाले आहे. गेल्या वर्षी हातावर शिक्के मारणे, तसेच प्रतिबंधित क्षेत्र करून त्या भागातील किमान शंभर-दोनशे मीटर प्रवेश बंद ठेवणे यांसह अन्य प्रकारची सक्तीची कारवाई शासनाकडून वरच्या पातळीवर केल्याने कोणत्या भागात रुग्ण आहे, हे सर्वांना समजत होते. हातावर शिक्के असल्याने असे लोक घराबाहेर येण्यास धजत नव्हते. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड जवळपास फुल होत आले आहेत. सध्या विंचूरमध्ये गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांनी दहा-पंधरा दिवस घरात थांबणे गरजेचे आहे. मात्र अनेक रुग्ण सर्रास घराबाहेर पडत असल्याने धोका वाढला आहे. लहान घरांमध्ये संपूर्ण सुविधा नसतानाही दोन-तीन रुग्ण गृहविलगीकरणात जात असून, गावात फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

रुग्ण सर्रास घराबाहेर पडत असल्याने धोका

शासनाकडून कोरोनारुग्णांची ओळख जाहीर करण्याचे आदेश नसल्याने कोण पॉझिटिव्ह, कोण निगेटिव्ह आहे हे समजायला मार्ग नाही. जास्त त्रास झाल्यावर बाधित रुग्ण दवाखान्यात भरती होत असल्याने घराशेजारी व्यक्तिलाही कोरोनाबाधितांची ओळख होत नाही. संबंधित रुग्णांच्या घरालगत प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावण्यास ग्रामपालिकेने सुरवात केली असली तरी अनेक कुटुंबीय यास विरोध करीत असून, फलक काढून टाकत आहेत. बाधित कुटुंबातील सदस्यांची चाचणी करण्यास अनेक जण वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विरोध करीत आहेत. नागरिकांच्या हितासाठी शासनाने रुग्णांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी पुढे येत आहे. शक्य झाल्यास संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करावे, अशी मागणी होत आहे. 

 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

उपस्थितांमध्ये पळापळ; विलगीकरणाच्या सूचना 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वेळीच ओळखल्याने त्याला तेथून बाहेर काढून देत गृहविलगीकरण किंवा रुग्णालयात भरती होण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या.