जेव्हा संयमाचीच होते पडताळणी! 18 तास रांगेत उभे राहूनही विद्यार्थी प्रमाणपत्राविनाच

नाशिक : जेव्हा संयमाचीच होते पडताळणी...विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, राखीव वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासह अन्‍य आवश्‍यक कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. त्‍यासाठी बुधवारी (ता. २०) अंतिम मुदत दिलेली होती. त्‍यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लांबच लांब रांग नाशिक-पुणे मार्गावरील समाजकल्‍याण विभागाच्‍या कार्यालयात लागली होती. जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी तब्बल अठरा तास रांगेत उभे होते. रात्रभर जातपडताळणी चालून सुद्धा फक्त 315 प्रकरणे निकामी लागले. अनेकजणांना बुधवारी (ता. 20) पर्यंत प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. 

विद्यार्थी, पालकांची प्रचंड फरफट...

न पाणी, न जेवण त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील चकर येऊन पडल्याच्या घटना घडल्या. कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने गोंधळाचीही स्थिती निर्माण झाली होती. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांत नाराजी व्यक्त झाली. तर विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्र जमा करावी लागत असून, पालकांच्या कागदपत्रांसह कोर्ट अॅफिडेविटचा समावेशही यामध्ये आहे. ही कागदपत्रे वेळेत जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत सुरु होती.

एजंटगिरीला अभय?

समाजकल्याण विभागाच्या परिसरात एजंटांना समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनीच अभय दिल्याची खमंग चर्चाही कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात सुरु होती. कोणत्याही दडपण अन् भीतीशिवाय हे एजंट या आवारात वावरत असल्याचे दिसून येत आहे.

कर्मचारी रजेवर गेल्याने यंत्रणेवर ताण

इमारतीच्या तिन्ही मजल्यावर मुलांच्या ऑफलाइन अर्ज दाखल करण्यासाठी रांग लावलेली होती. त्यांचे अर्ज ऑफलाइन पडताळणी करून लागलीच त्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याची प्रक्रिया बुधवारी राबविण्यात आली. त्यामुळे कागदपत्रे तपासणीनंतर अवघ्या दीड ते दोन तासांत अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडताळणी प्रमाणपत्रे पडली. कार्यालयात केवळ अधिकारी हेच शासकीय कर्मचारी असून, उर्वरित स्टाफ हा आउटसोर्सिंग केलेला आहे. पडताळणीचे कामकाज पाहणारा एकमेव शासकीय कर्मचारी रजेवर गेल्याने यंत्रणेवर ताण आला असल्याची चर्चा आहे. जात पडताळणीची गर्दी वाढलेली असतानाही संबंधित कर्मचारी रजेवर गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ऑ​नलाईन अर्ज केलेल्यांना करावे लागले पुन्हा ऑ​फलाईन अर्ज 

ज्या विद्यार्थ्यांनी याआधी ऑनलाईन अर्ज केले होते, त्यांना पुन्हा अर्ज करावे लागले. अर्ज करुन देखील अनेकांना प्रमाणपत्र मिळाले नाहीच. अधिकाऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्जाची ३० प्रकरणे दोन तासांनी निकाली काढले जात होते.

अखेर विद्यार्थ्यांना दिलासा

जात वैधता मुदतीत तातडीने मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांनी मुदतवाढ मागितली होती. या मागणीची दखल घेत सामायिक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रिभूत प्रवेश परिक्षा संपण्याच्या अंतिम तारखेपर्यंत विद्यार्थी हे प्रमाणपत्र सादर करु शकणार आहे.

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

आतापर्यंत एक हजार ७९ विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने जारी केलेले आहे. मात्र, र्स‍व्‍हरला व्‍यत्‍यय आल्‍याने वरिष्ठांच्‍या सूचनेनुसार ऑफलाइन पद्धतीने जातवैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे. काही विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे जातवैधता प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. जात दावा सिद्ध करणारे सर्व पुरावे असतलेल्‍या विद्यार्थ्यांना तत्‍काळ जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. त्‍यासाठी अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. - माधव जाधव, उपायुक्‍त, समाजकल्‍याण विभाग  

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार