जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आपल्या पक्षातील खासदार-आमदारांनी घेतलेल्या निर्णयामागील अडचण लक्षात घेणे गरजेचे आहे. पन्नास खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज असून जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी बोलले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे खनिकर्म व बंदरे मंत्री यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व त्यांच्या समर्थकांवर शरसंधान केले.

नाशिक दौऱ्यावर गुरूवारी (दि.६) आलेल्या ना. भुसे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ना. पवार वित्तमंत्री असताना आमच्या आमदारांची त्यांच्यावर नाराजी होती, हे नाकारता येणार नाही. त्यावेळी आमच्या नाराजीची दखल घेणे हे आमच्या प्रमुखांचे काम होते. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करताना आता कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मंत्रीमंडळाची ४३ संख्या ही निश्चित असून महायुती सरकारम‌ध्ये मंत्रीपद हे कमी-अधिक प्रमाणात होत असतात. मात्र, मंत्री पद हे एकच ध्येय नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे भुसे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हे २० ते २२ तास काम करणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत. संघटना वाढीच्या दृष्टीने आम्ही सर्वजण नियोजन करत असल्याचे भुसे म्हणाले.

राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णंय वरिष्ठ पातळीवर झाला. शपथविधीचा सोहळा अचानक झाल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची वेगाने सुरू असलेल्या घौडदौडवर विश्वास ठेवत सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णय घेतला. शासनामध्ये त्यांच्या समावेशाबद्दल आमच्यामध्ये कोणतीही नाराजी व वाद नसल्याचे भुसे यांनी सांगितले. दरम्यान, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना देशाचे नेतृत्व बघून मतदारराजा हा मतदान करतो, असा टोला त्यांनी लगावला. आगस्ट एन्डपर्यत पाण्याचे नियोजन सुस्थितीत करण्यात आल्याने पाणीकपातीचा निर्णय आला नसल्याचे भुसे यांनी सांगितले.

ते कधीच होणार नाही

पोपटांच्या डोक्यात जे काही चाललय आहे ते कधीच होणार नाही, अशा शब्दांत ना. भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली. खा. राऊत यांना मानहानीची नोटीस दिली असून माफी न मागितल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशाराही भुसे यांनी दिला.

दोनदिवसांपासून भोंगा बंद

दोन दिवसांपासून कोणताच स्कोप नसल्याने भोंगा बंद होता अशा शब्दांत ना. भुसे यांनी खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तीन पक्ष एकत्र आल्याने काहीतरी अस्वस्थता निर्माण करावी असे त्यांना वाटत असून गोरगरीबांचे कल्याण बघवत नसल्याची टीकाही भुसे यांनी राऊत यांच्यावर केली. तसेच जागा वाटपाचा निर्णय तीन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून घेतील, असे भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post जे खाेक्यांवर बोलत हाेते त्या बोक्यांनी आता बोलले पाहिजे : ना. दादा भुसे appeared first on पुढारी.