ज्ञानदानाची मंदिरे अंधारात अन् डिजिटल यंत्रणा धूळखात; विद्यार्थी ज्ञानापासून वंचित 

येवला (जि.नाशिक) : काहींना वीजजोडणीच नाही, तर काहींचे वीजबिल थकल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ७५७ शाळांना अंधारात ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. सुमारे ५५० शाळांची तर वीजजोडणी देखील कट करण्यात आल्याने या शाळा अंधारात आहेत. किंबहुना कोरोनामुळे सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग सुरू असताना अनेक शाळांना आपले साहित्य मात्र गुंडाळून ठेवण्याची वेळ विजेअभावी आली आहे. 

शाळांची डिजिटल यंत्रणा धूळखात
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शाळांवर ही वेळ येत असून, वीजबिलासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी शासनाने खास वीजबिलासाठी निधी उपलब्ध करण्याचा जीआर काढला, पण अद्यापही निधी नसल्याने शाळांची डिजिटल यंत्रणा धूळखात आहे. 

वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की
एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधांसाठी कुठलेही अनुदान नसतांना गुरुजींनी लोकसहभाग घेऊन प्रगती साधत नवी पिढी घडविणाऱ्या या शाळांना वीज कंपनीकडून व्यासायिक दराने वीजपुरवठा केला जातो. 
मुळात लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटले आहे. जवळपास सर्वच शाळा डिजिटल होऊन चिमुकले हात माऊस फिरवत तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण घेत असताना या शाळांना वीजबिल भरण्यासाठीची स्वतंत्र निधीची तरतूदच नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढावली आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

संगणकीय ज्ञानापासून वंचित राहण्याची वेळ
एकीकडे वर्षभर कोरोनाने घात केला असून, शाळा बंद असतानाही वीज कंरनीने अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केल्याने शाळांना हे बिल पेलवणे शक्यच नाही. अगोदरच तीन-चार वर्षांपासून वीजबिल थकीत होते. त्यात या कोरोना काळातील वीजबिलाची भर पडली. वीजबिल न भरल्याने वीज कंपनीने विजेचा पुरवठा कट केला. शाळेत वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानापासून वंचित राहण्याची वेळ जिल्ह्यातील शाळांमधील आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांवर आली आहे. 

संगणक कपाटात 
शाळेत वीज नसल्याने अनेक शाळांनी आपले संगणक सीपीयू, मॉनिटर काढून ठेवले आहेत. काही शाळांनी कपाटात, तर काहींनी कार्यालयात हे साहित्य ठेवले आहे. एक तर शाळा बंद अन् साहित्य असूनही ऑनलाइन अध्यापनासाठी त्याचा उपयोग होत नसून नाइलाजाने शिक्षक मोबाईलचा वापर करून शक्य तसे अध्यापन करत आहेत. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

तात्पुरता पर्याय पण कागदावर 
डिजिटल शिक्षणाला ब्रेक लागला आहे. या शाळांचे वीजबिल भरण्यासाठी शासनाने जिल्ह्यासाठी २८ लाखाचे विशेष सादिल अनुदान दोन महिन्यांपूर्वी मंजूर केल्याने अंधारात चाचपडणाऱ्या या शाळांचे विद्यार्थी पुन्हा एकदा संगणकाच्या टिकटिक सोबत संगणकावर ज्ञान आत्मसात करण्याचा आशावाद निर्माण झाला आहे. मात्र यासाठी केव्हा मुहूर्त लागणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 

 

जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा खंडित होणे गंभीर बाब आहे. सर्व शाळांना वीजजोडणी करून बिलांची तरतुद परस्पर केली जावी किंवा वीज अनुदान या हेड खाली अनुदान उपलब्ध करून बिलांचा प्रश्न कायमचा सोडवावा. विजेअभावी तालुक्यांमध्ये ५० लाखांचे संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर, डिजिटल, टीव्ही आदी साहित्य धूळखात पडलेले आहेत. त्यामुळे सर्व शाळांना १५ व्या वित्त आयोगातून सोलर सिस्टिम पुरवल्यास या सर्व शाळा पुन्हा डिजिटल राहतील 
-प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला 

अशी आहे शाळाची वीजपुरवठ्याची स्थिती 

तालुका - एकूण शाळा - वीज नसलेल्या - खंडित केलेल्या 
बागलाण - २९८ - १६ - ३५ 
चांदवड - १८२ - ८ - २१ 
देवळा - ११८ - १८ - १० 
दिंडोरी - २१३ - ८ - २२ 
इगतपुरी - २२२ - ७ - ४० 
कळवण - २०३ - १३ - ६१ 
मालेगाव - २९० - २१ - ५६ 
नांदगाव - २१३ - ४९ - ८७ 
नाशिक - १०७ - ० - ३ 
निफाड - २२४ - ७ - ९ 
पेठ - १८८ - २ - ७ 
सिन्नर - २०८ - १ - ५ 
सुरगाणा - ३१७ - २२ - ५९ 
त्र्यंबक - २४५ - ८ - ११३ 
येवला - २३६ - २७ - २२ 
एकूण - ३२६६ - २०७ - ५५०