ज्ञानाचे दिवे लागले तरच बळीचं राज्य येईल : डॉ. सदाशिव सूर्यवंशी

Dhule

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सण आणि परंपरांच्या माध्यमातून आपल्या चिकित्सक बाबी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत. देशात ज्ञानाचे दिवे लागले, तरच खऱ्या अर्थाने बळीचे राज्य येईल, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. मराठा सेवा संघ कार्यालयात महासम्राट बळीराजा प्रतिमा पुजन आणि ‘लोकांचा राजा बळिराजा’ या विषयावर प्रा.डॉ. सूर्यवंशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील होते.

यावेळी डॉ सूर्यवंशी म्हणाले की, बळीराजाच्या राज्यात प्रजा सुखी व समाधानी होती. प्रत्येक माणूस आनंदाने राहत होता. आपण विविध सण साजरे करतो त्यामधून चिकीत्सक बाबी समजून घ्यायला हव्यात. महात्मा ज्योतिबा फुलेंचा गुलामगिरी व विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांचे बळीवंश सारखे संशोधन ग्रंथ अभ्यासकांना खरा बळीराजा समजून घेण्यास मदत करतील. अशा पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. बळीराजा बहुजनांचे राजे नव्हे तर सबंध मानव जातीचे राजे होते. संपूर्ण मानव जातीला बळीराजांचे विचार समजतील आणि खरा बळीराजा समजून घेतला जाईल तेव्हा बळीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

या वेळी डी.एस.कुवर, वाय.आर.मंडाले, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव वसुमती पाटील, कलाशिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी.ए.पाटील, कृषी मंचचे विभागीय उपाध्यक्ष प्रवीण पाटील, पी.एन.पाटील, नितीन पाटील, साहेबराव देसाई, लहु पाटील, सुलभाताई कुंवर, नुतनताई पाटील, अर्चनाताई खैरनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post ज्ञानाचे दिवे लागले तरच बळीचं राज्य येईल : डॉ. सदाशिव सूर्यवंशी appeared first on पुढारी.