ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूचा विळखा; मृतांमध्ये मधुमेही, रक्तदाब रुग्णांचे प्रमाण अधिक 

नाशिक : गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाला तोंड देणाऱ्या एकूण बाधितांपैकी एक हजार १४८ नागरिकांना मृत्यूने कवटाळले. यातील साठपेक्षा अधिक वयोगटातील सर्वाधिक नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमध्ये गंभीर आजाराचे ३७९ नागरिक असून, त्यातही मधुमेह असलेल्या १३४ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागल्याची बाब महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. 

गेल्या वर्षी ६ एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबरपर्यंत कोरोनावाढीचा वेग अधिक होता. ऑक्टोबरनंतर संख्या कमालीची घटली, ती जानेवारीपर्यंत कायम होती. फेब्रुवारी व मार्चमध्ये कोरोनाने पुन्हा उच्चांक गाठला. ३१ मार्चअखेरपर्यंत शहरात एक लाख १४ हजार २७६ रुग्ण आढळले. त्यातील ९७ हजार ४४ रुग्ण उपचार करून घरी सोडण्यात आले. एक हजार १४८ मृत्यू, तर सध्या १६ हजार ८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सरकारी, खासगी लॅब व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट चार लाख १६ हजार ८७२ करण्यात आल्या. त्यातून एक लाख १४ हजार ८३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मृत्यू पावलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय असून, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे व कोमॉर्बिड अर्थात गंभीर आजाराच्या रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

वयोगटानुसार मृत्यू 

-पंधरा वर्षांखालील- १ 
-१५-३० वयोगट- २० 
-३१-४० वयोगट- ७० 
-४१-५० वयोगट- १२७ 
-५१-६० वयोगट- २६८ 
-६० पेक्षा अधिक वयोगट- ६६२ 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

गंभीर आजारांमधील मृत्यू 
-मधुमेह- १३४ 
-उच्च रक्तदाब- ६३ 
-हृदयरोग- २९ 
-इतर आजार- २८ 
-किडनी- २ 
-श्‍वसन- १२२ 
-ताप- १