
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
काही दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे शाहरुख नावाच्या एका तरुणाने बारावीत शिकणार्या विद्यार्थिनीला पेट्रोल शिंपडून जिवंत जाळले. ती ४५ टक्के भाजली होती. २८ ऑगस्ट रोजी त्या मुलीचा दुःखद मृत्यू झाला. शाहरुखला अटक केल्यानंतरही पश्चाताप तर दूरच, तो निर्धास्तपणे हसताना दिसला, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे शाहरुखला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, अंकिता हत्या प्रकरण केवळ मारेकर्यांपुरते मर्यादित न ठेवता, अशा घटनांमागील मुख्य सूत्रधारांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी. या प्रकारासाठी केंद्र सरकारने लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करावा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा येथील गणेशभक्तांवर लाठीमार करणार्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे. धानोरा येथे गणेश विसर्जनाच्या वेळी विनाकारण गणेश मंडळातील सदस्यांवर आणि निष्पाप गणेश भक्तांवर लाठीमार करून त्यांना अमानुष मारहाण करणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांना त्वरित निलंबित करावे आणि गणेश भक्तांना न्याय मिळवून द्यावा. अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर यांनी केल्या आहे.
या आंदोलनात जळगाव मधील सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी समाजसेवक आनंद मराठे आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनीही मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा :
- राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा ‘मास्टर प्लॅन’ प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार?
- मुख्यमंत्री झटकताहेत जबाबदारी : तारा केरकर
- पेठ येथे गाडीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
The post झारखंड प्रकरणातील शाहरुखला फाशीची शिक्षा द्या; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी appeared first on पुढारी.