‘टपाल’चे सर्व्हर डाऊन! कामकाज ठप्प; ज्येष्ठांना मनस्ताप 

पंचवटी (जि.नाशिक) : टपाल खात्याच्या सर्व्हर डाऊनमुळे गत दोन दिवसांपासून सर्वच प्रकारचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह टपाल खात्याचे कर्मचारी व अल्पबचत प्रतिनिधींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

अल्पबचत प्रतिनिधींसह कर्मचारीही त्रस्त 
कधीकाळी आॅफलाईन पद्धतीने काम करणा-या टपाल खात्याने मागील वर्षांपासून आॅनलाईन सेवा सुरू केली. या योजनेचे अल्पबचत प्रतिनिधींसह खात्यात पैसे काढण्यासाठी येणा-या ज्येष्टांनीही सुरवातीला स्वागत केले. परंतु कालपासून टपाल खात्याचे चेन्नईस्थित सर्व्हर शुक्रवारपासून (ता.२६) डाऊन झाले आहे. त्यामुळे सगळीकडची आॅनलाईन प्रणाली विस्कळीत झाली आहे. यामुळे पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी येणा-यांना कोणताही व्यवहार न करता माघारी परतावे लागत आहे. 

ज्येष्ठांचा दृढ विश्‍वास 
टपाल खात्याच्या मासिक प्राप्ती योजनेत चांगले व्याजदर मिळत असल्याने ही योजना लोकप्रिय आहे. याशिवाय खात्याच्य सिनिअर सिटिझन्स योजनेवर १ टक्का अधिक व्याज मिळत असल्याने सेवानिवृत्तांचा अधिक विश्‍वास आहे. त्यामुळे या दोन खात्यांतच ज्येष्ठांची काही कोटी रूपयांची गुंतवणूक असून त्यावरील व्याजावर अनेकांची उपजिविका चालते. परंतु कालपासून सर्वच प्रकारचे व्यवहार ठप्प असल्याने सर्वांनाच मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

कर्मचारीही हतबल 
टपाल खात्याच्या व केंद्र सरकारविषयीच्या विश्‍वासार्हतेमुळे अनेकांनी मासिक प्राप्तीसह सिनिअर सिटीझन योजनेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. मात्र कालपासून सर्वच सेवा ठप्प झाल्याने कामासाठी खात्याचे कर्मचारी अन काम घेऊन येणा-या ग्राहकांत वादावादीचे प्रसंगही घडत आहे. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

एटीएम सेवाही बंदच 
टपाल खात्याचा सर्व्हर काल (ता. २६) डाऊन झाला. परंतु त्यापूर्वी पासूनच टपाल खात्याच्या आवारातील एटीएम सेंटरदेखील तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने ग्राहकांना मनस्ताप करावा लागत आहे. 

 
टपाल खात्याचा चेन्नई येथील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे कामकाजात काही प्रमाणात विस्कळितपणा आला आहे, सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- मोहन अहिरराव, अधिक्षक 
टपाल विभाग, नाशिक
 
 
सर्व्हर डाऊनमुळे टपाल खात्याच्या कर्मचा-यांसह सर्वच अल्पबचत व अन्य प्रतिनिधींना कालपासून मोठा मनस्पात सहन करावा लागत आहे. बंद पडलेली सेवा लवकर कार्यान्वित व्हावी. - प्रभाकर कारभारी मोगल, ज्येष्ठ बचत प्रतिनिधी 
--------------