टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील?

नाशिक/नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ; सध्या ललित पानपाटील-पाटील हा ड्रग्ज माफिया म्हणून राज्यात ओळखला जात आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक केली आहे. याप्रकरणानंतर ललित पाटील हा राज्यभरात चर्चेत आला आहे. मात्र प्रत्यक्षात टवाळखाेरीपासून ड्रग्ज माफियापर्यंतचा ललितचा प्रवास अनेकांना तोंडात बोट घालायला लावणारा आहे. त्याच्या या प्रवासात राजकीय, सामाजिक व पोलिसांशी असलेले संबंधही कामी आल्याचे चित्र आहे. त्यातच पैशाच्या जाेरावर ड्रग्जचे कारखानेच टाकून एकप्रकारे त्याने तरुण पिढी बर्बाद करण्याचा विडा उचलल्याचेच दिसते.

आरपीआय ते शिवसेना पक्षात सहभागी

ललितच्या ओळखीच्यांच्या दाव्यानुसार तो महत्वाकांक्षी होता. मात्र त्याने त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला. शिक्षणात कमी असल्याने त्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमधील उठ-बैस वाढवली. त्यातून काही गुन्हेही त्याच्याविरोधात दाखल झाले. त्यानंतर त्याने धाक दाखवून, ओळखीच्या जोरावर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसोबत ओळख वाढवली. सुरुवातीस आरपीआय नंतर शिवसेना पक्षात सहभागी होत राजकीय पाठबळ मिळवल्याचे दिसते. त्याचप्रमाणे जिल्ह्यातीलच एका आमदाराकडे काही दिवस काम करीत गुन्हेगारी क्षेत्रातील वजन वाढवल्याचेही बोलले जाते. दरम्यान, कारागृहातील ओळखीच्या जोरावर त्याने ड्रग्ज व्यवसायात पाय ठेवल्याचे समोर येत आहे.

अल्पावधीत दुचाकी ते आलिशान कार

छोटा राजन टाेळीतील गुन्हेगारांशी संपर्कात येत त्यांच्याकडून सुरुवातीस ड्रग्ज पुरवठा करण्यात ललितने नेटवर्क तयार केले. त्यानंतर पुणे येथे कारखाना टाकला, मात्र कोरोना काळात कारखाना उघड झाल्यानंतर त्याचा धंदा बसला. मात्र त्याला पैशांची हाव शांत बसू देत नसल्याचे दिसते. त्याने त्याचा भाऊ व इतरांना हाताशी धरत शिंदे गावातच कारखाने सुरु करून एमडी बनवण्यास सुरुवात केली. राज्यातील नेटवर्कचा वापर करीत त्याने ड्रग्ज अंमली लोकांपर्यंत पोहचवत कोट्यवधी रुपये कमवले. अल्पावधीत दुचाकी ते आलिशान कार असा प्रवास अंमली पदार्थ विक्रीतून त्याने केला. कारागृहात असतानाही त्याने पैशाच्या जोरावर रुग्णालयात अलिशान ‘ट्रिटमेंट’ घेतल्याचे समोर आले आहे. दररोज हजारो रुपये देऊन पाहिजे त्या सुख सुविधा घेतल्या आणि रुग्णालयात बसूनच ड्रग्ज वितरण करून इतरांच्या आरोग्याशी खेळ केला.

प्रेयसी वकिलाचीही मदत

कोणालाही घाबरायचे नाही, कामाची लोकं ओळखून त्यांच्यासोबत ओळखी वाढवून हेतू साध्य करण्याचे कसब ललितला अवगत आहे. त्या जोरावर त्याने राजकीय, सामाजिक, पोलिस दलात तसेच गुन्हेगारी क्षेत्रात ओळखी वाढवून त्या जोरावर ड्रग्जचे जाळे राज्यासह देशभरात पसरवल्याचे दिसते. त्याला रुग्णालयातून फरार होण्यात पोलिसांसह प्रेयसी वकिलाचीही मदत झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ‘पैशांनी सर्व काही घेता येते’ या उक्तीचा ललितने वापर केल्याचे त्याच्या गुन्हेगारी प्रवासातून दिसते.

ललितला दोन मुलं, त्याचे पोलिसांशीही धागेदोरे

आई-वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले अशी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. त्याचा भाऊ भुषण पाटील व ललित पाटील हे दोघे अड्डा चालवायचे. त्यांना एक महिला मदत करीत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे नाशिकच्या काही पोलिसांसोबत धागेदोरे असल्याची चर्चा असून पोलिसांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले तर सर्वकाही माहिती उजेडात येऊ शकते असेही बोलले जात आहे. मात्र पोलीस प्रशासन संशयित पोलिसांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा खुद्द पोलीस वर्तुळात केली जाते आहे.

हेही वाचा :

The post टवाळखोरी ते ड्रग्ज माफिया, कोण आहे ललित पाटील? appeared first on पुढारी.