Site icon

टायर कंपन्यांच्या समभागांनी पकडला सुपरफास्ट वेग

नाशिक : राजू पाटील

गुंतवणुकीच्या विश्वात

एमआरएफने चौथ्या तिमाहीत आपले निकाल जाहीर केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून टायर स्टॉक्सने अपट्रेंड दाखवायला सुरुवात केली आहे. एमआरएफच्या शेअरची किंमत जवळपास एक लाखाचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस बाजार घसरत असताना एमआरएफच्या समभागांच्या किमतीत सुमारे 4 टक्के वाढ झाली आहे. महिनाभराचा विचार केल्यास अपोलो टायर्सच्या 11.8 टक्क्यांनी, बाळकृष्ण इंडस्ट्रित 8.7 टक्क्यांनी, सीएटमध्ये 16.9 टक्क्यांनी, गुडइयर इंडियामध्ये 7.6 टक्क्यांनी, जेके टायरमध्ये तब्बल 19.3 टक्क्यांनी तर एमआरएफमध्ये 13.2 टक्क्यांनी वाढ झाली.

गेल्या तीन वर्षांपूर्वी टायर समभागांची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू होती. परंतु गेल्या दीड वर्षात टायर उद्योगात वेगाने चित्र बदलत चालले आहे. त्यामागील ही तीन प्रमुख कारणे आहेत.

1) मजबूत असे तिमाही निकाल
एमआरएफने मार्च 2023 मध्ये संपलेल्या कालावधीसाठी त्याचे तिमाही निकाल जाहीर केल्यावर टायर कंपन्यांच्या समभागांनी वेग घेत तेजी दाखविली आहे. एमआरएफने गेल्या बुधवारी चौथ्या तिमाहीत 3.1 अब्ज रुपये करोत्तर एकत्रित नफा नोंदवला आहे, जो वार्षिक आधारावर 86 टक्क्यांनी वाढलेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1.7 अब्ज रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्यांचा एकत्रित महसूल 58.4 अब्ज रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 53 अब्ज रुपयांच्या तुलनेत 10.1 टक्के अधिक आहे. एमआरएफने 169 रुपये प्रतिशेअर अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षासाठी एकूण 175 रुपये लाभांश दिलेला आहे. एमआरएफच्या तिमाही निकालाला गुंतवणूकदारांनी संपूर्ण टायर उद्योग क्षेत्राला चिअर्स अशीच प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा क्षेत्रातील आघाडीची कंपनी जोरदार कामगिरी दर्शवते, तेव्हा इतर टायर कंपन्यांचे समभागदेखील अशाच प्रकारे कामगिरी करतील, अशी आशा गुंतवणूकदारांना वाटत आहे. एमआरएफच्या निकालांनंतर, सीएट, जेके टायर, टीव्हीएस श्रीचक्र आणि गुडइयर इंडियासह इतर टायरचे समभागदेखील 5 ते 8 टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, अपोलो टायर्सने 357 रुपयांचा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या एका आठवड्यात, कच्च्या मालाच्या किमतीतील दरतिमाहीनुरुप घसरणीमुळे मार्च 2023 च्या तिमाहीत मजबूत कामगिरीच्या अपेक्षेने अपोलाचा समभाग आठ टक्क्यांनी वाढला.

2) कच्च्या मालाच्या किमतीत घसरण
कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक रबराच्या घसरलेल्या किमती हे टायर कंपन्यांच्या समभागातील तेजीचे आणखी एक कारण आहे. 2023 च्या सुरुवातीपासून, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा या क्षेत्राला खूपच फायदा झालेला आहे. टायर उद्योगाच्या एकूण खर्चात रबरचा मोठा हिस्सा आहे. रबर उत्पादक कंपन्या कृत्रिम रबरासाठी कच्चा माल म्हणून कच्च्या तेलाचा उपघटक म्हणून वापर करतात. टायर बनवण्यासाठी एमआरएफ क्रूड वेस्ट कार्बन ब्लॅकचा प्रमुख कच्चा माल म्हणून वापर करते. एकूण कच्च्या मालाच्या किमतीपैकी सुमारे 30 टक्के टायर्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या तेलाचे डेरिव्हेटिव्ह आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा थेट परिणाम टायर कंपन्यांचे एकूण मार्जिन वाढण्यास होतो. गेल्या दोन वर्षांत नैसर्गिक रबराच्या किमतीही घसरल्या होत्या. कमकुवत मागणी आणि उच्च साठापातळी यामुळे रबरच्या किमतीत घसरण सुरू झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये, चीनकडून कमी मागणी अन् जास्त पुरवठा यामुळे नैसर्गिक रबरच्या किमती दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. घसरलेल्या रबराच्या किमतीमुळे टायर कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा होणार आहे.

3) मागणीत वाढ
टायरचा साठा वाढण्याचे तिसरे कारण म्हणजे जोरदार मागणी. टायर हे ऑटोमोबाईल उद्योगाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे, वाढणारा ऑटोमोबाईल उद्योग टायर उद्योगासाठी वाढीच्या संधी दर्शवतो. ग्राहकांच्या उत्पन्नात सुधारणा, गेल्या तीन आर्थिक वर्षातील अल्प पातळीवर कंपन्यांसाठी असलेला आधार आणि पुरवठा साखळीतील सुधारणांमुळे वाहन उद्योग क्षेत्राला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे, रबर कंपन्यांना मूळ उपकरण उत्पादकांकडून जोरदार मागणी दिसू शकते. वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे टायरची मागणी वाढणार आहे. तसेच, टायर दुरुस्ती हीसुद्धा स्थिर गतीने वाढत आहे. आर्थिक गतीत सुधारणा, मालवाहतुकीत वाढ, पायाभूत सुविधांवर अधिकाधिक खर्च, साहित्याच्या किमतीत वाढ न होणे आदी घटकांमुळे 2023-24 मध्ये टायर उद्योगाच्या वाढीसाठी उत्तम वातावरण आहे. ऑटोमोबाईल उद्योगातील आणखी एक मोठा बदल म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढीने भारतात ईव्हीच्या वाढत्या मागणीमुळे टायरच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळेच टायर कंपन्यांचे समभाग सुसाट धावत आहेत.

या लेखात देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले लेखक अभ्यास करून देत असतात. पण; गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.

The post टायर कंपन्यांच्या समभागांनी पकडला सुपरफास्ट वेग appeared first on पुढारी.

Exit mobile version