टाळू, ओठांच्या विसंगतीग्रस्त बालकांसाठी ‘महा स्माइल्स’ उपक्रम

महा स्माइल्स' उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- क्लेफ्ट केअरसाठी काम करणारी जगातील प्रमुख संस्था स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व्हने ‘महा स्माइल्स – क्लेफ्ट केअर फॉर एवरी चाइल्ड’ या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत, क्लेफ्ट प्रभावित (टाळू किंवा ओठावरील विसंगती) असलेल्या मुलांची चाचणी करून त्यांना वेळीच उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच याबाबत महाराष्ट्रात सर्वसमावेशक जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

बाल आरोग्यसाठी बजाज फिनसर्व्हने सीएसआरच्या माध्यमातून या मोहिमेसाठी भरीव मदत दिली आहे. त्याअंतर्गत त्यांनी स्माइल ट्रेनच्या सहाय्याने गत नऊ वर्षांत 60 हजार क्लेफ्ट शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. हा नवीन प्रकल्प महाराष्ट्रातल्या विसंगतीग्रस्त बालकांना आठ हजार शस्त्रक्रियांद्वारे सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देणार आहे.

भारतात दरवर्षी 35 हजारांपेक्षा जास्त शिशू टाळू किंवा ओठावरील विसंगती घेऊन जन्माला येतात. त्यांपैकी अनेकांना अंधश्रद्धा, समाजात प्रचलित असलेल्या रुढी, गैरसमज किंवा आर्थिक अडचणींमुळे बहुतांश वेळा उपचार मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून हा प्रकल्प दोन हेतूने काम करणार आहे. पहिल्या हेतूत विसंगतीग्रस्त बालकांना हुडकून काढणे आणि स्माइल ट्रेनच्या हॉस्पिटलच्या नेटवर्कद्वारे त्यांच्यावर उपचार करणार आहे. या उपक्रमाचा दुसरा हेतू म्हणजे क्लेफ्टविषयी जागरूकता वाढवणे आणि जन्मतः दुभंगलेले टाळू किंवा ओठावरील विसंगतीग्रस्त पालक आणि नागरिकांना शिक्षित करणे हा आहे. ‘महा स्माइल्स’ उपक्रमाद्वारे क्लेफ्ट केअरसाठी एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले आहे, जे महाराष्ट्रातील विशिष्ट भागात सुरू होईल आणि नंतर राज्याच्या विविध प्रदेशांमध्ये राबविला जाणार आहे. क्लेफ्टग्रस्त कुटुंबांनी स्माइल ट्रेनच्या टोल-फ्री- १८०० १०३ ८३०१ क्रमांकावर संपर्क साधता येईल.

हेही वाचा

The post टाळू, ओठांच्या विसंगतीग्रस्त बालकांसाठी 'महा स्माइल्स' उपक्रम appeared first on पुढारी.