टीडीआर घोटाळा : चौकशीला सुरवात; नगररचना विभागाकडे कागदपत्रांसाठी पत्रव्यवहार 

नाशिक : देवळाली शिवारातील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुरवात केली आहे. यापूर्वीच्या प्रशासन उपायुक्तांच्या चौकशी समितीने अहवाल अंतिम केल्यानंतरही नवीन समिती गठीत करण्यात आली. त्यामुळे दोन समित्यांचे अहवाल वेगळे आल्यास प्रशासनाची नाचक्की होण्याची शक्यता असल्याने नकार देण्यात आला होता. परंतु आयुक्त कैलास जाधव यांनी चौकशीचे स्पष्ट निर्देश दिल्याने नगररचना विभागाकडे घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. 

टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला सुरवात 
देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१/अ मधील आरक्षित जागेचा व्यवहार करताना चुकीची जागा दर्शवून महापालिकेला शंभर कोटींचा चुना लावण्याचा प्रकार समोर आला होता. यासंदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. ॲड. शिवाजी सहाणे यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीची चौकशी सुरू असतानाच दोनदा कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार घडले होते. परंतु प्रशासन उपायुक्तांच्या दालनात याचिकाकर्त्यांनी धिंगाणा घातल्यानंतर कागदपत्रे जागेवरच असल्याचा दावा प्रशासन उपायुक्तांना करावा लागला. दुसरीकडे नव्याने नियुक्ती झाल्यानंतर आयुक्त जाधव यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली.

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

नगररचना विभागाकडे कागदपत्रांसाठी पत्रव्यवहार 

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार दाखल असल्याने तेथेही सुनावणी सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी सुरू करण्यापूर्वी पूर्वीच्या समितीचा अहवाल अंतिम असल्याने वेगळा निर्णय कसा द्यायचा, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे स्पष्ट निर्देश दिल्याने समितीने नगररचना विभागाकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. टीडीआर वाटपाच्या डीसीआर क्रमांक ७२७ च्या नोंदींमध्ये नगररचना विभागाकडे सर्व्हे क्रमांक २९५ संदर्भात जितके पत्रव्यवहार झाले आहेत, त्या सर्वांची माहिती मागविण्यात आली आहे.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा