टोमॅटोची लाली उतरली! बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो रस्त्यावर; शेतकरी चिंतेत

घोटी (जि. नाशिक) : अस्मानी सुलतानी आणि आता व्यापारी मनमानीला शेतकरी पुरता हैराण झाला आहे. बागायती पिकांना लाखो रुपये भागभांडवल लावून देखील बाजारभाव कोसळल्याने रस्तोरस्ती टोमॅटो रस्त्यावर ओतून दिले जात आहे. तर, बाजार समिती आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले टोमेटो आठवड्याभरापासून पडून आहे. लावणी ते विकेपर्यंत काटकसर करून देखील वेळेवर बाजार भाव घसरला जातो. हे दरवर्षीप्रमाणे का व कसे घडते यावर विचार होणे अपेक्षित आहे. 

नंबर वन टोमॅटो प्लॅस्टिक जाळीचा भाव १०० रुपयांपेक्षा अधिक भावाने खरेदी केला जात नाही. दोन नंबर टोमेटो चाळीस ते पन्नास रुपयांना विकावा लागत आहे. टोमॅटोची लाली घसरल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तोडणी केलेले टोमेटो पशुपालक जनावरांना खाद्य म्हणून घालत असल्याचे चित्र जागोजागी दिसून येते, तर काही रस्त्यावर ओतून आपला संताप व्यक्त करताना दिसतात. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

लोकप्रतिनिधी यावर विचार करावा!

तालुक्याचा भौगलिक विस्तार मोठा असल्याने बाजार समिती आवारात भाजीपाला आणताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत असते. वेळेवर व्यापारी माल खरेदीपुढे येत नाही, त्यात मनमानी पद्धतीने माल खरेदी केला जातो. यावर फारसा अंकुश नाही. भाजीपाला पिकांवरील प्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. भाजीपाला मालाच्या विक्रीसाठी आणि बाजार समितीस दुसरा पर्याय जोपर्यंत उभा राहत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल आणि व्यापाऱ्यांची मनमानी यास चाप लावणे कठीण आहे. मुंबई बाजारपेठेत चारशे रुपये बाजारभावाप्रमाणे विक्री केली जाते. मग ग्रामीण शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सूज्ञ लोकप्रतिनिधी यावर विचार करायला हवा. दर पाडून माल खरेदी करायचा आणि मुंबई बाजारपेठेत चारपटीने तो विकायचा यात केवळ व्यापारी मालामाल होतांनाचे चित्र बदलणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी आंदोलने, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आणि सर्वसाधारण नागरिकांची फरफट यातून बोध घ्यावा लागेल. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू