दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; सध्या टोमॅटोचे बाजारभाव कोसळले असून, मातीमोल दराने ते विकण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. मशागतीपासून ते विक्रीपर्यंत होणारा खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Tomato Price Nashik)
दिंडोरी तालुक्यातील खोरी फाटा, पिंपळणारे फाटा व दिंडोरी येथे टोमॅटो मार्केट असून, मागील पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण कायम आहे. हवामानातील बदलामुळे ऊन जास्त पडत असल्याने टोमॅटो लवकर पिकत असल्याने उत्पादन वाढले आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर होत असून, दिवसेंदिवस भावात घसरत होत आहे.
संबधित बातम्या :
- मनोज जरांगेंच्या सभेला अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा जनसागर उसळला
- Nashik News : गंगापूर धरणातील पाण्याचा बदलतोय रंग ; पाणी प्रदूषित?
उत्पादन खर्चात वाढ
वातावरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाण जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी असले तरी येथील शेतकऱ्यांनी शेततळे, टँकरने पाणीपुरवठा करत टोमॅटो पिकाची लागवड केली. शिवाय रासायनिक खतांच्या किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ, मजुरीत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. (Tomato Price Nashik)
टोमॅटो पिकाला एकरी खर्च सुमारे एक लाखाच्या आसपास होतो. शेती मशागत, रोप, तारा बांधणी, मंडप, खुरपणी, औषधे, तोडणी, मजुरी, वाहतूक व इतर खर्च या पिकासाठी होतो. सुमारे पाच ते सहा महिने टोमॅटो बागासाठी काम करावे लागते. सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत आहेत. अवेळी पडणारा पाऊस व वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने औषधांवर मोठा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
टोमॅटो पिकाचे अर्थचक्र
टोमॅटो पिकासाठी शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये खर्च येतो. त्यात 40 ते 50 रुपये 20 किलो जाळीला बाजारभाव मिळत आहे. खुडण्यासाठी मजुरी 20 रुपये, वाहतूक भाडे 20 रुपये खर्च येत आहे. एकरी साधारण 700 ते 800 जाळी निघते, त्यातून शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावाने 35 हजार रुपये मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
टोमॅटो पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च व कष्ट करावे लागतात. सध्याची बाजारभावाची परिस्थिती पाहिली, तर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. बाजारभाव वाढले की सरकारला ग्राहकांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात. मग बाजारात भाव पडले, तर शेतकऱ्यांचे अश्रू सरकारला का दिसत नाही. सरकारने शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे.
– सागर पाटील, टोमॅटो उत्पादक शेतकरी, मोहाडी
मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये टोमॅटो उत्पादनात वाढ झाली आहे. तेथील माल झाडावर परिपक्व होतो. त्यामुळे जास्त दिवस टिकतो, येथील मालाला उठाव मिळत नाही.
– भूषण देशमुख, टोमॅटो व्यापारी
हेही वाचा :
- निळवंडे कालव्यातून आज सुटणार पाणी..! : महसूलमंत्री विखे पाटील
- Joe Biden on ‘Hamas’: ‘हमास’ संघटना ‘अल-कायदा’ पेक्षाही घातक – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
- Raj Kundra-Urfi Javed : ‘उर्फी राज’ वादादरम्यान एकत्र, मास्क मॅन बनून…
The post टोमॅटो दर पडल्याने शेतकरी हतबल, हमीभावाची होतेय मागणी appeared first on पुढारी.