ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर

Accident

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील धोतरखेडे शिवारातील मुंबई – आग्रा महामार्गाने ट्रॅक्टरला जोडलेले धान्य काढण्याच्या मशीनला अज्ञात ट्रक चालकाने पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टर वरील एक जण गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भूत्याणे येथे हल्ली राहत असलेले बाबूलाल नोपाराम वर्मा (३९. मूळ रा. चारनवास हुडील, नावा (नागौर, राजस्थान) यांच्याकडे सोयाबीन काढण्याचे मशीन आहे. हे मशीन ट्रॅक्टर (आर. जे. ३७, आर. ए. ९६३६) ला जोडून वडाळीभोईकडून नाशिकबाजूकडे मुंबई आग्रा महामार्गाने घेऊन जात होते. यावेळी त्यांच्या सोबत नारायणलाल उदाराम (भिल) (रा. बार, ता. भीम, राजसमंध राजस्थान) व कुंदनमल लक्ष्मणराम वर्मा (चारनवास) हे ट्रॅक्टरवर बसलेले होते. ट्रॅक्टर धोतरखेडे शिवारात असताना पाठीमागच्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून त्याने ट्रॅक्टरला जोडलेल्या मशीनला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नारायणलाल उदाराम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर बाबूलाल नोपाराम वर्मा व कुंदनमल लक्ष्मणराम वर्मा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक एस. आर. माळी यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेबाबत बाबूलाल वर्मा याने फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post ट्रकची जोरदार धडक; ट्रॅक्टरवरील एक ठार, एक गंभीर appeared first on पुढारी.