ट्रॅक्टर नांगरणी महागली! डिझेल दरवाढीचा फटका; शेतकरी संतप्त

चांदोरी (जि.नाशिक) : चांदोरी व परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, डिझेलच्या दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस बसला आहे. शेतकरी संतप्त झाला असून, ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका 
सद्यःस्थितीत पेरणीपूर्वीचा हंगाम सुरू असल्याने व उन्हाळ्यात शेती चांगली भाजल्यास मृग नक्षत्रात पडणारा पाऊस नांगरणीमुळे शेतात मुरला जातो. या कारणाने शेतीची नांगरणी करण्यात शेतकरी व्यस्त आहे. बैलांच्या सहाय्याने नांगरणीऐवजी सध्या ८० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करूनच मशागत करतात. गेल्या वर्षी दोन हजार रुपये असलेला ट्रॅक्टरच्या एकरी नांगरणीचा दर यंदा दोन हजार ५०० रुपये इतका झाला आहे. निसर्गाच्या विविध अरिष्टांसोबत डिझेल दरवाढीचा फटकादेखील बसत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

डिझेलच्या दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस

डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करावयाची मशागत महागली आहे, तसेच शेतमाल बाजार समितीपर्यंत नेणाऱ्या वाहतुकीचा दर वाढल्याने ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या कात्रीत बळीराजा सापडला आहे. यांत्रिकी युग असल्याने शेतकरी आधुनिक शेतीला पसंती देतात. पूर्वी शेतीची कामे बैलांच्या सहाय्याने केली जात होती. मात्र, बैलांची संख्या कमालीची घटली असून, यांत्रिकी शेती करण्यावरच शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे. ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत त्वरित होत असल्याने नांगरणी, फवारणी, शेतमाल वाहतूक, पेरणी, रोटाव्हेटर आदी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे भाव वाढत असल्याने याचा परिणाम शेतीच्या मशागतीवर झाला आहे. 
आता डिझेलचे दर ८८ रुपये लिटरपर्यंत गेल्याने नांगरणी व कोळपणी करण्यासाठी शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा किमान हेक्टरी एक हजार रुपये इतका अधिक भार उचलावा लागत आहे. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा

सध्या एक एकर नांगरणीला १० ते १२ लिटर डिझेल लागते. ट्रॅक्टरसोबत चालक व मदतनिसांचा खर्च वेगळा लागतो. डिझेल दरवाढीमुळे दोन हजार ५०० रुपये एकरी दर करूनही परवडत नाही.-रावसाहेब गडाख, ट्रॅक्टरमालक, चांदोरी 

सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेती करणे दिवसेंदिवस तोट्याची होत चालली आहे. इंधनाबरोबर मजुरी, रासायनिक खते, औषधांच्या किमतीचे दर विचारात घेता दहा वर्षांपूर्वी शेतमालाचे दर तेच होते. आजही तेच आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने नफा शिल्लक राहत नाही. शासनाने याचा कुठेतरी विचार करायला हवा. -प्रमोद गायखे, शेतकरी, चांदोरी