ठक्कर डोम कोविड सेंटर पुन्हा नाशिककरांच्या सेवेत; शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत लढाई 

नाशिक : बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने पुन्हा एकदा कोरोना काळात नाशिककरांच्या मदतीला धावून येत ३२५ बेडचे कोविड सेंटर ठक्कर डोम येथे उभारले असून, सेंटर नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्‌घाटन झाले. महापालिका व क्रेडाई संस्थेने कोविड सेंटरमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत कोरोनाविरोधाची लढाई संपणार नाही. क्रेडाईप्रमाणे इतर संस्थांनीदेखील लढाईत सहभागी होण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. 

उद्‌घाटन सोहळ्यास महापौर सतीश कुलकर्णी, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका सभागृहनेते सतीश सोनवणे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. राजेंद्र भंडारी, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, मनोज खिंवसरा, रंजन भालोदिया, हंसराज देशमुख, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. श्री. भुजबळ म्हणाले, की मागील वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने क्रेडाईने स्वतःहून पुढाकार घेऊन साडेतीनशे खाटांचे कोव्हिड सेंटर नाशिककरांच्या सेवेत बहाल केले होते. क्रेडाईच्या कोविड सेंटरमुळे महापालिका यंत्रणेवरचा ताण हलका झाला. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सेंटर बंद केले होते. परंतु आता प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी पायाभुत सुविधा निर्माण केल्या जात असल्या तरी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, हेदेखील सत्य आहे. त्या मुळे खासगी डॉक्टर, नर्स, परिचारिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महापौर कुलकर्णी म्हणाले, की नाशिककरांसाठी क्रेडाईने कोविड केअर सेंटरची केलेली निर्मिती कौतुकास्पद बाब आहे. क्रेडाईचे माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर यांनी मनोगत व्यक्त केले. रवी महाजन यांनी प्रास्ताविक केले. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

ठक्कर डोम कोविड सेंटरमध्ये महापालिका व क्रेडाईने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असून, इतर संस्थांनीदेखील कोविड लढ्यात पुढाकार घ्यावा. 
-छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक 

कोविडचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून पुन्हा एकदा क्रेडाई संस्था मैदानात उतरली आहे. अन्य संस्थांनीही सामाजिक जबाबदारीतून कोरोना लढ्यात सहभागी व्हावे. 
-रवी महाजन, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो, नाशिक 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा