ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नाशकातून रसद

उद्धव बाळासाहेब ठाकरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा सालाबादाप्रमाणे यंदाही शिवतीर्थ (दादर) येथेच होणार असून, या मेळाव्यासाठी नाशिकमधून २० हजार शिवसैनिक सहभागी होतील, असा दावा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केला आहे.

शालिमार येथील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (दि. २३) या मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक पार पडली. त्यामुळे सहसंपर्कप्रमुख गायकवाड यांनी मेळाव्याच्या सज्जतेचा आढावा घेत, या मेळाव्यासाठी नाशिकमधून शिवसैनिकांची मोठी रसद पाठविली जाणार असल्याचे सांगितले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गद्दारांमध्ये सुरू असलेली सुदोपसुंदी, अनेकांना स्वगृही परतण्याचे लागलेले वेध, नाशकात उद्ध्वस्त करण्यात आलेला ड्रग्जनिर्मितीचा कारखाना आणि या प्रकरणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाई त्यांच्यावरील आरोप, राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती, आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेला विलंब, महागाईने गाठलेला कळस, वाढती बेरोजगारी, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा होत असलेला गैरवापर आदी मुद्द्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागल्याचे 0ला विशेष महत्त्व आहे .

गद्दारांची होत असलेली नाचक्की आणि महायुतीच्या सरकारमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात आणि कुणावर ते आसूड ओढणार त्याचीही उत्सुकता सर्वांना असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नमूद केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, कोणत्याही स्थितीत ठाकरे गटाचा भगवा महापालिकेवर फडकवायचा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे आणि शिवसैनिक त्यादृष्टीने कामाला लागल्याचे मनोगत मनपातील माजी गटनेते विलास शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, सचिन मराठे, युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ, महानगर संघटक देवा जाधव, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सूर्यवंशी, मसूद जिलानी, माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे उपस्थित होते.

हेही वाचा :

The post ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी नाशकातून रसद appeared first on पुढारी.