डंपरच्या धडकेत महापालिका कर्मचारी ठार; नागरिकांचा प्रशासनाविषयी संताप  

इंदिरानगर (जि.नाशिक) : पाथर्डी-देवळाली रस्त्यावर शुक्रवारी (ता.४) सकाळी डंपरच्या धडकेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी अजय सुभाष सारसर (वय २९, रा. वडाळा) ठार झाले. मृत्यूचा सापळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या मार्गावर प्रलंबित असलेली दुभाजकाची मागणी नागरिकांनी केली. सकाळी सारसर त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १५ डीएफ ७८०९) पाथर्डी फाट्याकडे येत असताना हॉटेल सेलिब्रेशनजवळ समोरून येणाऱ्या डंपरने (एमएच १५ एफव्ही ८००१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते ठार झाले.

डंपर चालकाला अटक

ते अविवाहित होते. त्यांच्या मागे आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. अपघातानंतर सभागृहनेते सतीश सोनवणे, नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम डेमसे, विभागीय अधिकारी मयूर पाटील, कामगार युनियनचे सुरेश मारू, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, अशोक दोंदे, राहुल गायकवाड, वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आदींनी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

दुभाजकाची मागणी 
उपस्थितांनी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्याची मागणी केली. दोन वर्षांत याठिकाणी १० ते १२ जणांना जीव गमवावा लागला आहे. अनेक जण जायबंदी झाले आहेत. निधी नाही म्हणून दुभाजक मंजूर केलेला नाही. हे दुभाजक पाथर्डी गावापर्यंत होण्यासाठी अनेकदा महापालिकेत पत्रव्यवहार केल्याची माहिती नगरसेवक दोंदे आणि डेमसे यांनी दिल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच