डांबराचा ढीग वाया गेला, पण रस्ता दुरुस्त नाहीच; नाशिक-औरंगाबाद मार्ग रस्त्याचे हाल

म्हसरूळ (नाशिक) : रस्त्यात खड्डे पडलेले असताना ते बुजविण्यासाठी खडी आणि डांबराचा वापर करण्याऐवजी त्या खडी आणि डांबर यांचे मिश्रण असलेला ढीग औरंगाबाद रोडवर पडून आहे. डांबर वाळल्याने ढीग कडक बनला आहे. या रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असताना ते बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे हा खडी-डांबराचा ढीग वाया गेला; पण रस्ता दुरुस्त झाला नाही.

रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत दुर्लक्ष

पंचवटीला नवीन आडगाव नाका येथे मुंबई-आग्रा महामार्गाला येऊन मिळणाऱ्या औरंगाबाद रोडवर वाहतुकीची कायम वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी आहे. असे असताना या रस्त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एवढे नाहीतर ठिकठिकाणी अवजड वाहनांच्या चाकांनी खोल खळगी पडून या रस्त्यावरील डांबर आणि खडीचा ढीग तयार झाले.

पुन्हा खड्डे ‘जैसे थे’

नवीन आडगाव नाका ते मानूर शिवार, असा पाच किलोमीटरचा भाग हा नाशिक महापालिकेच्या हद्दीत येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात औरंगाबाद रोडचे रुंदीकरण करण्यात आले. हा रस्ता वळणाचा, तसेच उंच-सखल भागाचा आहे. काही दुभाजकाच्या जवळ पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे तेथे पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे खड्डे पडत आहेत. हे खड्डे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. पाऊस सुरू असताना असे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात खडी आणि मुरूम टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, पाऊस पडल्यानंतर पुन्हा खड्डे ‘जैसे थे’ होतात.

हेही वाचा >  विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

पावसाळा संपल्यानंतर या खड्ड्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. असे असताना ते बुजविण्याऐवजी खडी आणि डांबर यांचे मिश्रण रस्त्यावर टाकून त्याचा ढीग सुकून जात असताना खड्डे तसेच आहेत. दोन वर्षांपूर्वी नवीन आडगाव नाक्याच्या बस थांब्याजवळच्या भागात असाच खडी-डांबराचा सुकून कडक झालेला ढीग पडून होता. तसाच ढीग आता जनार्दन स्वामी आश्रम ते सेवा सोसायटी यांच्या मधील भागातील रस्त्याच्या कडेला पडून आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात