डाळिंबाच्या काळवंडलेल्या ‘लाली’ची आंबेबहारावर मदार; महागाईमुळे उत्पादन खर्च एकरी दोन लाखांवर

नाशिक : वरुणराजाच्या दणक्यात लेट मृग बहाराच्या डाळिंबाच्या बागांमध्ये फुलगळ झाली. बागेत कुजवा वाढला. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत डाळिंब विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या बागांमधील उत्पादनावर पाणी फिरले. डाळिंबाची ‘लाली’ काळवंडली. मात्र जानेवारीमध्ये धरलेल्या आंबेबहारावर आता शेतकऱ्यांची मदार आहे. मात्र सध्याच्या महागाईच्या झळांमुळे एकरी उत्पादन खर्च दोन लाखांपर्यंत पोचला आहे. 

डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की जुलै-ऑगस्टमध्ये सांगली, सातारा, सोलापूर अशा जिल्ह्यात लेट मृग बहार शेतकरी धरतात. हे क्षेत्र ५० टक्क्यांपर्यंत असते आणि शेतकऱ्यांना २० लाख टनांपर्यंत या हंगामापासून उत्पादन मिळते. मात्र पावसाने बागांपुढील प्रश्‍नांची मालिका वाढविल्याने फुलगळ आणि कुजवा हा प्रश्‍न भेडसावला नाही, अशा बागांमधून चार ते पाच लाख टनांच्या आसपास उत्पादन मिळाले. लेट मृग बहाराची डाळिंबे डिसेंबरपासून ते मार्चअखेरपर्यंत बाजारात विक्रीसाठी येतात. आता राज्यातील शेतकऱ्यांनी आंबेबहार धरला आहे. पण महागाईमुळे उत्पादन खर्च ४० टक्क्यांनी वाढला आहे. आताच डीएपी आणि १० ः २६ ः २६ या खतांच्या किमतीत टनाला दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच, काय तर प्रतिकूल परिस्थितीतून शेतकरी मार्गक्रमण करत असताना त्यांना आता उत्पादनाच्या वाढलेल्या खर्चाच्या भुर्दंडाच्या झळा सोसाव्या लागताहेत. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

दहा लाख टनांनी उत्पादनात वाढ 

आंबेबहाराचे उत्पादन यंदा राज्यात दहा लाख टनांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सांगून श्री. चांदणे म्हणाले, की लेट मृग बहारामध्ये नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळपास ३० टक्के शेतकऱ्यांनी आंबेबहार धरला आहे. शिवाय पाण्याची उपलब्धता आहे, अशाही शेतकऱ्यांनी आंबेबहाराला पसंती दिली आहे. त्यामुळे राज्यातील आंबेबहाराचे क्षेत्र ५० हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे. त्यातून १५ ते १६ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. आंबेबहाराच्या डाळिंबाची काढणी १५ जूनपासून सुरू होईल. हे डाळिंब ऑगस्टअखेरपर्यंत बाजारात उपलब्ध असेल. निर्यातीसाठी खूपच कमी उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांचा आंबेबहाराकडे फारसा कल नसतो. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

राजस्थानमध्ये चांगला बहार 

राजस्थानमध्ये तीन हजार हेक्टरवर डाळिंबाचा आंबेबहार धरला गेलाय. हा बहार चांगला असल्याने डाळिंबाचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे. याच पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील आंबेबहाराच्या डाळिंबाची स्थिती काय राहील, या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. चांदणे म्हणाले, की आंबेबहाराकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. या बहाराचे डाळिंब एकदम बाजारात येणार आहे. त्यातच, निर्यातीसाठी मर्यादा असल्याने जूनमध्ये डाळिंब बाजारात येईल, तेव्हा भावाची स्थिती काय असेल, हे आता सांगणे कठीण आहे.