डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक; व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मालेगाव (नाशिक)  : कोठरे (ता. मालेगाव) येथील मदनसिंग मगर (वय ५५) या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची सुमारे साडेअकरा लाख रुपये किमतीची १५ टन डाळिंबे खरेदी करून या मालापोटी दिलेला धनादेश न वठवता त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. 

या प्रकरणात अजयसिंग ठाकूर (रा. ओडिशा, ह.मु. नाशिक व राहता) या परराज्यातील व्यापाऱ्याविरुद्ध येथील वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

संशयिताचा शोध सुरु

मगर यांच्या कोठरे शिवारातील शिवारातून ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ यादरम्यान अजयसिंग ठाकूर या व्यापाऱ्याने विश्‍वास संपादन करून १५ टन डाळिंब वेळोवेळी खरेदी केला. या डाळिंबापोटी ठाकूरने मगर यांना कोटक बँकेचा शाखा मुंगसे (ता. मालेगाव) ११ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश (क्रमांक ४२३४८५५०३) दिला.  मगर यांनी हा धनादेश वडनेर शाखेत जमा केला. त्या वेळी संशयिताच्या खात्यावर (क्रमांक १९१३९६६६७५) रक्कम शिल्लक नसल्याने धनादेश वठला नाही. संशयिताने भूलथापा देऊन विश्‍वासघात करून डाळिंब खरेदी केले. तसेच रक्कम अदा न करता फसवणूक केल्याची तक्रार मगर यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून ठाकूर याच्याविरुद्ध वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. 
 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...