
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
डिजिटल करन्सीमुळे (आभासी चलन) देशाची अर्थव्यवस्था, सुरक्षा तसेच बॅंकिंग व नोटप्रेस क्षेत्रातील रोजगार धोक्यात येणार आहेत. सायबर हल्ले व सायबर क्राइम वाढून नागरिकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीला विरोध करण्यासाठी देशभरात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि.२६) नाशिकरोड प्रेसच्या यु. एस. जिमखाना हाल येथे बॅंकिंग तज्ज्ञ, कामगार नेते विश्वास उटगी यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोडसे म्हणाले की, देशात नाशिकरोड, देवास (मध्य प्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल), म्हैसूर (कर्नाटक) येथे चलनी नोटांची छपाई होते. डिजिटायझेशन, ऑनलाइन व्यवहारामुळे नोटांचा वापर कमी होत असून, नोटांच्या प्रेसवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेने १ डिसेंबरपासून डिजिटल ॲड सुरू असून मुंबई, दिल्ली, बंगळुरू, भुवनेश्वर या शहरात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. अन्य शहरांतही हा प्रयोग होणार आहे. फोन पे सारख्या या ॲपमुळे नोटांचा व प्रत्यक्ष बॅंकिंगचा वापर कमी होणार आहे. डिजिटल करन्सीचे धोके लक्षात घेऊन तिला विरोध करण्यासाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर, बॅंकिंग संघटनांचे पदाधिकारी, बॅंकिंग तज्ज्ञ यांची भेट घेऊन व्यापक चळवळ, जनजागृती केली जाणार आहे. प्रेस मजदूर संघाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कामगार नेते विश्वास उटगी यांच्या व्याख्यानाने जनजागृतीला सुरुवात होत आहे. लवकरच बॅंकिंग फेडरेशनच्या पदाधिकारी, बॅंकिंग तज्ज्ञ, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा :
- चुलत्यानेच केली पुतण्याची जमीन हडप; पारोडी येथील प्रकार
- टाकळी भीमातील नागरिक बिबट्यामुळे भयभीत
- टाकळी भीमातील नागरिक बिबट्यामुळे भयभीत
The post डिजिटल करन्सीच्या व्यवहाराला नाशिकमधील प्रेस कामगारांचा विरोध appeared first on पुढारी.