डिजिटल विश्व : ‘अँड्रॉइड गर्ल’कडून पाच अ‍ॅपस् अन् तीन वेबसाइटस्ची निर्मिती

आदिश्री www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे
‘हल्लीची पिढी ही तंत्रस्नेही आहे’ या वाक्याचा अर्थ सांगणारी कामगिरी आदिश्री अविनाश पगार या 11 वर्षाच्या चिमुरडीने केली आहे. तिने एक दोन नव्हे तर तब्बल पाच अँड्रॉइड अ‍ॅपस्ची निर्मिती केली असून, तीन वेबसाइटही बनविल्या आहेत. विशेष बाब म्हणजे तिने बनविलेले सर्व अ‍ॅप अन् वेबसाइट या समाजात प्रबोधन घडविणार्‍या असून, नुकत्याच तिने बनविलेल्या ‘ट्रॅफिक अ‍ॅप’ची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे किंबहुना अपघातच होऊ नये याबाबतचे आदर्श मॉडेलच तिने या अ‍ॅपमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

मूळची बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील रहिवासी असलेली अन् सध्या सटाण्यात वास्तव्यास असलेली आदिश्री पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने डिजिटल युगाचा विचार करून डिजिटल माध्यमातूनच लोकांमध्ये प्रबोधन करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. आतापर्यंत तिने निर्माण केलेले सर्वच अ‍ॅप अन् वेबसाइटही प्रबोधनात्मक असून, त्या माध्यमातून समाजात जनजागृती करणे हा उद्देश आहे. आतापर्यंत तिने पाणी बचतीसाठीसाठी ‘वॉटर सेन्सेशन’ या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर झाडांचे महत्त्व पटवून देणारे ‘ऑक्सिजन’ अ‍ॅप, चिमुकल्यांसाठी ‘स्कूल चले हम’, विविध देशांच्या ध्वजांची माहिती देणारे ‘फ्लॅग्ज ऑफ कंट्रिज’ यासह तिने ‘ट्रॅफिक अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. सामाजिक प्रबोधन हा हेतू समोर ठेवूनच तिने या सर्व अ‍ॅपस्ची निर्मिती केली आहे. नुकतेच तिच्या या अ‍ॅपचे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल डॉ. मनोहर महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयीची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.

वाहतूक :  वाहतुकीसंबंधीच्या सर्व चिन्हांची वर्गवारीदेखील यामध्ये बघावयास मिळते. त्याव्यतिरिक्त वाहतूक दिशादर्शक, वेगमर्यादेविषयीचे चिन्ह, रस्त्यांच्या दुतर्फा असणारे चिन्ह, वाहनांची काळजी घेणे, बोधवाक्य, राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वाहन नोंदणी क्रमांक याचादेखील अ‍ॅपमध्ये समावेश आहे.

शेतकरी, हवामानाचा समावेश : सध्या आदिश्रीचे हे अ‍ॅप वाहनधारकांसाठी खूपच उपयुक्त ठरत असून, अपघात टाळण्यासाठी या अ‍ॅपचा चांगला उपयोग होताना दिसत आहे. याव्यतिरिक्त आदिश्रीने पाणी फाउंडेशनचे काम सांगणारे ‘सेव्ह वॉटर, सेव्ह लाइफ’ तसेच ‘वॉरियर्स ऑफ हेल्थ’ या वेबसाइटचीही निर्मिती केली आहे. तिची ‘माझ्या स्वप्नातील गाव’ ही वेबसाइट स्वप्नातील गावाचा प्रचार व प्रसार करणारीच आहे. इंग्रजी व मराठी भाषेमधील या वेबसाइटच्या माध्यमातून गावात हव्या असणार्‍या गोष्टींची माहिती अत्यंत सुलभतेने दिली आहे. शासकीय योजनांचे महत्त्व, साक्षरता, आरोग्य सेवा केंद्र, जलव्यवस्थापन, झाडांचे महत्त्व आदी बाबी तिने यामध्ये अधोरेखित केल्या आहेत. शेतीबरोबरच हवमाान, दुग्धव्यवसाय, पशुपालन, मत्स्यशेती, कुक्कुटपालन, जलव्यवस्थापन आदींचीदेखील तिने या अ‍ॅपमध्ये माहिती दिलेली आहे. एकूणच आदिश्रीच्या या अ‍ॅप आणि वेबसाइटमुळे तिची ‘अँड्रॉइड गर्ल’ म्हणून सर्वदूर ओळख होताना दिसत आहे. आदिश्रीला आणखी वेगवेगळ्या समाजप्रबोधनात्मक अ‍ॅपस् आणि वेबसाइटची निर्मिती करायची असल्याचे ती सांगते.

‘प्रोग्रॅमिंग कोडिंगविषयी’ पुस्तिका लेखन : वेबसाइटसाठी लागणार्‍या प्रोग्रॅमिंग भाषेच्या ‘लर्न बूटस्ट्रप वेब डिझाइन’ या पुस्तिकेचे लेखनदेखील आदिश्रीने केले आहे. इतरांना ही पुस्तिका उपलब्ध व्हावी याकरिता तिने ती वेबसाइटवर अपलोड केली आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून वेबसाइट निर्मितीची आवड जोपासणार्‍या आदिश्रीने वेबसाइट बनविण्यासाठी लागणार्‍या प्रोग्रॅमिंग कोडिंगचा अभ्यास केला. त्यातूनच तिने या पुस्तिकेचे लिखाण केले.

दीडशे वृक्षांचा क्यूआर कोड : अँड्रॉइड गर्ल आदिश्रीने नाशिक शहर तसेच परिसरातील भारतीय जातीच्या तब्बल दीडशे झाडांचा क्यूआर कोड तयार केला आहे. या कोडवर क्लिक करताच त्या झाडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. उंटवाडीतील जो वटवृक्ष तोडला जाणार होता, त्यावेळी आदिश्रीने वृक्षप्रेमींसोबतच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी तिने त्या वटवृक्षावर तयार केलेला क्यूआर कोड लावला असता, अनेकांनी तो स्कॅन करून वटवृक्षाची इत्यंभूत माहिती जाणून घेतली होती.

हेही वाचा:

The post डिजिटल विश्व : ‘अँड्रॉइड गर्ल’कडून पाच अ‍ॅपस् अन् तीन वेबसाइटस्ची निर्मिती appeared first on पुढारी.