डिजिटल सोने गुंतवणुकीकडे ग्राहक आकर्षित! परतावा जास्त मिळाल्याने वाढतोय कल

नाशिक : गुंतवणूक म्हणून पूर्वीपासून पारंपरिक सोनेखरेदी करण्यात येते. त्यात डिजिटल सोने खरेदीचा पर्याय उपलब्ध झाल्याने नाशिकमधील ग्राहक पारंपरिक सोने खरेदी पद्धतीपेक्षा डिजिटल सोने खरेदीकडे वळले आहेत. यात पारंपरिक पद्धतीपेक्षा मिळणारा परतावा जास्त असल्यामुळे, तसेच चोरीचा धोका नसल्याने ग्राहक आकर्षित होत असल्याचे दिसत आहे. 

डिजिटल सोने गुंतवणुकीकडे वाढता कल 

भविष्यातील तरतूद म्हणून सोने खरेदी केली जाते. गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणूनही सोन्याची खरेदी होत असते. यामध्ये डिजिटल सोने खरेदीची आता भर पडली आहे. सोने जवळ बाळगण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सोन्याची डिजिटल खरेदी ग्राहकांसाठी लाभदायक ठरत आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींसोबत सोन्याची खरेदीही डिजिटल करता येणे शक्य झाले असून, नाशिककरांचा डिजिटल सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

आधुनिक पर्यायांना ग्राहकांची हळूहळू पसंती

ईटीएफ गोल्ड, ई-गोल्ड, गोल्ड फंड, इक्विटी आधारित गोल्ड फंड, सोव्हरीन गोल्ड बॉन्ड्स आदी माध्यमांद्वारे डिजिटल सोने खरेदीचे पर्याय उपलब्ध आहेत. धोका नको म्हणून सोने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात येते. त्यात परतावा मिळत नसल्यामुळे डिजिटल सोने खरेदीकडे नाशिककरांनी गुंतवणूक वाढविली आहे. सोने जवळ बाळगणे हे सध्याच्या काळात जोखमीचे काम आहे. त्या मुळे आपली सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आधुनिक पर्यायांना ग्राहक हळूहळू पसंती देऊ लागले. 

 हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 

वीस टक्क्यांहून अधिक परतावा 
डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणुकीत सोने चोरी होण्याचा धोका कमी असल्यामुळे नाशिककर डिजिटल सोने खरेदीकडे आकर्षित होत आहेत. तसेच ग्राहकांना घरबसल्या सोने खरेदी-विक्री करता येते. यात तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना वीस टक्क्यांहून अधिक परतावा मिळत असल्याचे गुंतवणूक सल्लागार श्री. परेश गोटीवाले यांनी सांगितले.