डिझेल दरवाढीमुळे शेतीचे गणित बिघडले! खर्च वाढल्याने ताळमेळ बसविणे अवघड 

ब्राह्मणगाव (जि. नाशिक) : इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बहुसंख्य शेतकरी शेतीकामासाठी ट्रॅक्टर वापरतात. शेतीतही यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. यामुळे ट्रॅक्टरसह विविध उपकरणांना इंधनाची गरज भासते. डिझेल दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च वाढला आहे. ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांची कामे आता एका दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. 

शेतीची मशागत करणं झालं आवघड

प्रयोगशील शेतकऱ्यांची खाण असलेल्या कसमादेत यांत्रिकीकरणावर जोर धरला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरी ट्रॅक्टर आला आहे. शेतात एक पिक काढले की, अवघ्या एका दिवसात शेतीची मशागत करून दुसऱ्या पिकाची तयारी सुरू होते. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनांचा वापर होतो. ५० टक्के यंत्र साहित्याला डिझेल वापरले जाते. यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचतीसह परिश्रम वाचले असले तरी शेतीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरने भाडेतत्वावर काम करणाऱ्यांनीही नांगरणी, वखरणी यासह विविध कामांचे दर वाढविले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती मशागत अवघड झाली आहे. शेतीसाठीचा उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा बाजारभाव व सर्व खर्च पाहता शेतमालाला हमी भाव मिळणे आवश्‍यक झाले आहे. उत्पादन, शेतमाल वाहतूक खर्च वाढल्याने शेती आतबट्याची होऊ लागली आहे. महागाईला हातभार लागला आहे. पूर्वी पारंपरिक शेतीत मशागतीसाठी बैलजोडीस प्राधान्य दिले जायचे. यंत्रयुगात बैलजोडी जवळपास हद्दपार झाली आहे. अशा स्थितीत शासनाने इंधन व ट्रॅक्टरसाठीच्या डिझेलकरिता दरात सवलत व अनुदान देणे गरजेचे आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

मशागतीचे दर (प्रति एकर) 

मागील चालू 
नांगरणी ः १४००/१८०० 
रोटर मारणे : २२००/२५०० 
वाफे तयार करणे : १०००/१३०० 
सरी पाडणे : १८००/२००० 
पेरणी : १४००/१६०० 

विभागातून ९० टक्के शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करतात. डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ झाल्याने उत्पन्न आणि खर्च पाहता उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. 
- बबलू अहिरे, शेतकरी, ब्राह्मणगाव.श 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल