डुबेरेचा तरुण धरतोय दुग्धव्यवसायाची कास! कुटुंबाच्या आर्थिक गणितात होतेय सुधारणा

डुबेरे ( जि.नाशिक) : दोन वर्षांपासून होणाऱ्या मुबलक पावसामुळे परिसरातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने डुबेरे (ता. सिन्नर) येथील तरुण शेतकऱ्यांनी शेतीसह दुग्धव्यवसायाची अधिक पसंती दिली आहे. 

जमिनीची पातळी चांगल्या प्रमाणात निर्माण
मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या छायेत असलेल डुबेरे गाव माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या दूरदृष्टी प्रयत्नामुळे पाणीदार गाव म्हणून ओळखले जात आहे. वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात गाव परिसरात झाल्यामुळे जगबुडी बंधारा, ब्राह्मणदरा, शेंद्री, चीलंनदरा, धुपा बंधारा क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील जमिनीची पातळी चांगल्या प्रमाणात निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

डुबेरेतून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन
जलसंधारणाच्या कामामुळे शेतीतील शाश्‍वत चारा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना वाव मिळत असल्याने जनावरांना मुबलक प्रमाणात चारा मिळू लागल्याने पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे तरुणांनी वाट धरली आहे. त्यामुळे डुबेरेतून मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे. त्यातच गाव परिसरात चार ते पाच डेअरी संचालकांमार्फत दररोज दोन ते अडीच हजार लिटर दूध संकलन होत आहे. यासह गावातील तरुण शेतकरी बांधवांनी गावाच्या जवळच असलेले सिन्नर बाजारपेठेमध्येसुद्धा आपले दूध विक्रीसाठी नेत असल्याने दूध व्यवसायामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित सुधारत आहे. 
 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ 

चांगला पाऊस झाल्याने घरगुती चारा उत्पादन घेऊन दूध उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. परंतु दुधाचे चढ-उतार होणारे भाव नक्कीच शेतकऱ्यांसाठी मारक आहेत याचा विचार शासनाने करावा. -रमेश कुरणे, दुग्धव्यावसायिक शेतकरी 

कोरोना वातावरण व नोकरीची अनिश्‍चितता या विवंचनेत शेतकरी परिवारातील तरुण अडकला होता. घरातच राहून शेती व्यवसाय निगडित दुग्धव्यवसाय वाढविण्यावर तरुण शेतकऱ्यांनी भर दिल्याने दूध संकलन चांगल्या प्रतीचे होत आहे. -सुनील वाजे, डेअरी संचालक