डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड

विजयकुमार गावित

धुळे: पुढारी वृत्तसेवा

दररोज मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, मग कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले. त्यांनी चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या डोळ्यांचा देखील संदर्भ दिला आहे. त्यांच्या या वाक्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

शिरपूर येथे शबरी आदिवासी वित्त व विकास मंडळ तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना मत्स्य व्यवसाय, तसेच आवळा माता प्राथमिक भूजलाशयीन मत्स व्यवसाय सहकारी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. गावित यांनी मार्गदर्शन करीत असताना वादग्रस्त वाक्य वापरल्याने राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

मासे खाल्ल्याने दोन प्रकारचे फायदे होत असल्याचे त्यांनी सांगितले. हे फायदे सांगत असताना ते म्हणाले, “मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकणा दिसू शकतो. कुणीही पाहिले तरी पटवून घ्या. नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे. ती बेंगलोरची आहे. ऐश्वर्या दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचे ऑइल असते. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते.”

गावित यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले असून महिलांसंदर्भात केलेल्या या वक्तव्याचा विविध पातळीवरून नाराजी व्यक्त केली जाते आहे.

The post डॉ. विजयकुमार गावितांनी महिलांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड appeared first on पुढारी.