ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा ‘आक्राेश’

शिवसेना आक्रोश मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; येथील अमली पदार्थांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (दि. २०) शहरातून आक्राेश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या माेर्चावेळी पालकमंत्री दादा भुसे व सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी पालकमंत्री हटवा, नाशिक वाचवा; शासन आपल्या दारी वल्गना करी, नाशिकची तरुणाई होत आहे ड्रग्जमुळे भिकारी आदी घोषणा दिल्या.

शिवसेना उबाठा गटातर्फे शहरातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शालिमार येथील शिवसेना भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये तीर्थक्षेत्र कुंभमेळानगरी असलेल्या नाशिकची ड्रग्जमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख पुसून नाशिकला ड्रग्ज विळख्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. युवा पिढीला वाचविण्याची गरज असून त्यासाठी या माेर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी येथे येऊन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करत असताना नाशिकचे पोलिस काय करत होते, या प्रकरणी पालकमंत्री भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

शालिमार येथील शिवसेना भवन येथून प्रारंभ झालेला मोर्चा शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, रेड क्रॉसमार्गे, मेहेर सिग्नल व जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले होते. मोर्चामध्ये पक्षाचे उपनेते बबन घोलप, सुनील बागूल, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, वसंत गिते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, विनायक पांडे, संजय चव्हाण, विलास शिंदे, जयंत दिंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. मोर्चामध्ये नशामुक्ती संस्थेसह विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

रामकुंडात बुडविण्याची वेळ : राऊत

ड्रग्ज माफियांकडून पालकमंत्री दादा भुसे व आमदारांना हप्ते दिले जात असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहे. पण, या विषयावर सरकारने कुत्ता गोळी खाल्ली असून, पालकमंत्रीही कुत्ता गोळी खात शांत बसले आहेत. त्यामुळे या कुत्ता गोळीचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. नाशिकच्या कोयता गॅंगची सूत्रे नांदगावपर्यंत पोहोचत असून, त्याचा सूत्रधार नांदगावमध्ये बसला आहे. शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी ड्रग्ज माफियांच्या पैशाचा वापर झाला. ड्रग्जच्या मुळापर्यंत जाताना नाशिक ड्रग्जमुक्त केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. सत्ताधाऱ्यांना रामकुंडात बुडविण्याची वेळ आली आहे. नाशिकरांनी एक तर बुडवा किंवा तुडवा असे धोरण ठरवा, असे आवाहन खा. राऊत यांनी केले.

मोठ्या भाभीला हप्ता : राऊत

वडाळा गावातील छोट्या भाभीची ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी चाैकशी केली. परंतु, मोठ्या भाभीचे काय? असा प्रश्न उपस्थित करत खा. राऊत यांनी शहरातील एका महिला आमदारावर टीका केली. या मोठ्या भाभीला ड्रग्ज माफियांकडून १५ लाखांचा हप्ता मिळायचा, असा थेट आरोप त्यांनी केला. राज्याचे गृहमंत्री अमली पदार्थ सोडून इतर मुद्द्यांवर बोलत आहे. नशेच्या व्यसनामुळे १०० युवकांनी आत्महत्या केल्या असताना, गृहमंत्र्यांनी अन्य मुद्द्यांवर बोलणे योग्य नाही. गृहमंत्र्यांनी मुद्द्यावर बोलावे, अन्यथा आम्हाला गुद्द्यावर यावे लागेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला. शालिमार परिसरासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठा फाैैजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच माेर्चामध्ये साडेतीन ते चार हजारांची गर्दी सहभागी असेल, अशी माहिती पोलिस विभागामधील सूत्रांकडून देण्यात आली.

मेनरोडचे अतिक्रमण उठले

मोर्चामुळे शालिमार, शिवाजी रोड व मेन रोड परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे या भागाने काहीकाळ मोकळा श्वास घेतला. पोलिसांनी यावेळी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या सर्व सामान्य नाशिककरांचे हाल झाले.

फलकावर घोषणा

-गोदावरी व्यापली पाणवेलींच्या दुर्गंधीने, नाशिक व्यापले विषवल्लींने; त्या उखडून टाकण्यासाठी एकजूट.

-माफियांसाठी उघडे ससून… नाशिकच्या पालकमंत्र्यांचे झोप की, झोपेच नाटक?

-होणार होतो मेडिकलचा एमडी, नाशिकच्या माफियांनी बनविले ड्रग्जचा एमडी

-सत्ताधाऱ्यांना वेळीच थांबवा ड्रग्जग्रस्त तरुणांची दुर्दशा, नाहीतर निवडणुकीत गुंडाळावा लागेल गाशा.

-माफिया टोळी तरुण-तरुणींचा करतेय नाश, आम्हा पालकांना शासनाने द्यावा विश्वास, मग सोडू सुखाने निश्वास!

– ब्राउन शुगर मृत्यूचे आगर.

– अमली पदार्थ बंद करा, नाशिक वाचवा.

हेही वाचा :

The post ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा 'आक्राेश' appeared first on पुढारी.