
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील -पाटील व त्याचा भाऊ भूषण पानपाटील यांनी शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यातून एमडी तयार करून त्याचे देशभरात वितरण केल्याचे समजते. तसेच कारखान्यात दरमहा सुमारे ५० किलो एमडी तयार केले जात होते. ड्रग्ज विक्रीतून दोघा भावांना किमान ५० लाख रुपये दरमहा नफा होत असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. हे पैसे दोघांनी सोन्यात गुंतवल्याचे सूत्रांनी सांगितले.
ललित हा पुणे येथील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबरपासून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्या शोधासाठी पुणे, मुंबई व नाशिक पोलिस मागावर होते. मुंबई पोलिसांनी ललित यास बंगळुरू येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ललित हा कारागृहात असल्याने त्याने त्याचा भाऊ भूषण व मित्र अभिषेक बलकवडे यांच्या माध्यमातून शिंदे गावात एमडी बनवण्याचा कारखाना सुरू केला. हा कारखाना २०२१ मध्ये सुरू झाला आहे. या कारखान्यावर साकीनाका पोलिसांनी ५ ऑक्टोबरला कारवाई करीत १३३ किलो एमडी व ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल व साहित्य असे शेकडो कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारखान्यातून बनवलेला एमडी नाशिक वगळता सर्वत्र पुरवला जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. शिंदे गावातील कारखान्यातून संशयित दरमहा सुमारे ५० किलो एमडी बनवत होते. सुरुवातीस कारखान्यातून कमी प्रमाणात एमडी बनवला जात होता. मात्र संशयितांनी वितरण साखळी तयार करीत एमडीची मागणी घेण्यास व पुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पुणेसह राज्यभरातील इतर शहरांमध्ये ड्रग्ज पुरवठादारांचे जाळे विनले. त्यानंतर मागणी वाढल्यानंतर संशयितांनी एमडी बनवण्याचे प्रमाणही वाढवले. एमडी तयार केल्यानंतर संबंधित ठिकाणी पोहोचवण्यासाठी दोन ते तीन संशयितांवरच जबाबदारी देण्यात आल्याचेही पोलिस तपासात उघड होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमडीची मागणी तरुणवर्गाकडून सर्वाधिक असून, त्याची किंमतही महाग आहे. त्यामुळे दोन्ही भावांनी एमडी बनवण्याचे तंत्र अवगत करून कारखानाच टाकला. त्यानंतर मागणीनुसार पुरवठा करून दोघांनी त्यातून कोट्यवधी रुपये जमवले आहे. दरमहा दोघांनाही ५० लाख रुपयांचा किमान नफा होत होता.
मालमत्तांचा शोध सुरु
एमडी विक्री करून त्यातून कमवलेल्या पैशांची गुंतवणूक व वापर संशयितांनी कसा केला याची माहिती मुंबई पोलिस घेत आहेत. दोन्ही भावांसह त्यांच्याशी सतत संपर्कात असलेल्या तसेच पकडलेल्या संशयितांच्या आर्थिक व्यवहारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची बँक खाती, मालमत्ता शोधल्या जात आहेत.
ललित ची सफारी कार नादुरुस्त अवस्थेत पडून
ललित पानपाटील-पाटील हा काही वर्षांपूर्वी सफारी कार वापरत होता. ती कार शहरातील एका गॅरेजचालकाकडे नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या कारमध्येच निफाड पोलिसांना काही हत्यारे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच ललितच्या पत्नीचा अपघातही या कारमध्ये झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या कारची पाहणी केली असून, संबंधित गॅरेजचालकाकडे कारबाबत चौकशी केली आहे.
हेही वाचा :
- Sassoon Drug Case धडधाकट ललित पाटील नऊ महिने ससूनमध्ये कसा?
- Navratri 2023 : दुर्गेचे सहावे रूप : कात्यायनी
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य; शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
The post ड्रग्ज माफिया ललित-भूषणला दरमहा ५० लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.