ढकांबे शिवारात दहा लाखांचा मद्यसाठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : उत्पादन शुल्क विभागाने ढकांबे शिवारात तिघा तस्करांना जेरबंद करीत दादरा नगरहवेलीनिर्मित आणि राज्यात विक्रीस बंदी असलेला वाहनासह दहा लाख रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला. कळवण विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. 

अशी आहे घटना

चिरागकुमार फत्तेसिंग पढियार (वय २६), राघव अर्जुनभाई बारय्या (५४, रा. दोघे चौरेशी, जि. सुरत) व भूपेंद्रभाई केशवभाई बारय्या (५४, रा. भगवाननगर, वेद रोड, सुरत) अशी संशयितांची नावे आहेत. विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, अधीक्षक मनोहर अंचुळे व उपअधीक्षक बी. एन. भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २०) नाशिक-सापुतारा मार्गावरील ढकांबे शिवारात नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली. भरधाव येणाऱ्या (जीजे २१, बीसी ६५७०) या टीयूव्ही ३०० वाहनाची तपासणी केली असता त्यात दादरा नगरहवेलीनिर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. विशेष म्हणजे हा साठा प्लॅस्टिक पाउचमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सीलबंद होता. जिवंत बुचे मिळून आली असून, हा साठा वाहतुकीनंतर सीलबंद बाटल्यांमध्ये भरण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

कळवण विभागाच्या भरारी पथकाची कारवाई 

संशयितांच्या ताब्यातून वाहनासह नऊ लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. गुन्हा दाखल झाला असून, दुय्यम निरीक्षक डी. डी. चौरे तपास करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक आर. एस. सोनवणे, एम. बी. सोनार, जवान दीपक आव्हाड, जी. वाय. शेवगे, एम. सी. सातपुते, व्ही. ए. चव्हाण, पी. एम. वाईकर आदींच्या पथकाने ही केली.  

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण