ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

सिन्नर (नाशिक) : तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यातच शनिवारी (ता. १२) पहाटेपासून थंड हवेच्या लाटेने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असल्याने दिवसा शेकोट्या पेटवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या अशा वातावरणाचा पिकांवर विपरीत परिमाण होणार असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील बळीराजाची चिंता वाढली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे दोन दिवसांपासून थंडीचा जोर ओसरला आणि वातावरण ढगाळ बनले आहे. त्यातच शनिवारपासून थंड वारे वाहायला सुरवात झाली आहे. या अचानक झालेल्या बदलांमुळे आरोग्यासाठी अपायकारक परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, ज्वारीसारख्या पिकांवर चिकट्या रोग डोके वर काढू लागला आहे. तालुक्यात दोन दिवस सूर्याचे दर्शनदेखील झालेले नाही. शहरासह तालुक्यात सर्वत्र हीच परिस्थिती कायम असून, सायंकाळी काही भागात पावसाचे थेंब पडल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. सोमवारपर्यंत अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाचे मत आहे. मानवी आरोग्यास, तसेच पिकांसाठी असे वातावरण मात्र अपायकारक ठरणार आहे.  

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या