ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामाला ‘बुरे दिन’; रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने बळीराजा चिंतेत

इगतपुरी (नाशिक) : तालुक्याच्या विविध भागांत आठवडाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रदुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधाची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.

या वर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केली होती. ती अवकाळी पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी होती. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. आता ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडण्याबरोबरच त्यांच्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

पिके जगवण्याची धडपड

तालुक्यात किरकोळ प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. सद्यःपरिस्थितीत कांद्याची लागवड करून एक महिन्याचे होत आले आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळे पडून अगर करपण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करून शेतातील पिके जगवण्याची धडपड करीत आहे. या वर्षीच्या हंगामात थंडीची जाणीव झाली नाही. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर फारशी तेजी दिसून येत नसल्याने बळीराजा चिंता व्यक्त करीत आहे. 

आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळीबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. 
- कैलास जाधव, शेतकरी  

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...