ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची उडाली झोप; भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका 

जुनी शेमळी (जि.नाशिक) : परिसरात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व दाट धुके पडत असल्याने तसेच तुरळक पावसाच्या सरी पडल्यानंतर रब्बी हंगामातील गहू, हरभरा व सध्या सुरू असलेल्या लाल कांदालागवडीवर ढगाळ वातावरणामुळे मर, मावा, चिकटा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती असल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. 

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची उडाली झोप
नवी शेमळी, जुनी शेमळी, कॅनाल चौफुली परिसरात पावसाळ्यात मुसळधारेने कांदारोपाचे अतोनात नुकसान झाले. नव्याने कांदारोपे विकत घेऊन उशिरा कांदा लागवडीसाठी शेतकरी व्यस्त आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची शेंडे पिवळी पडून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रब्बी हंगामातील पिकांबरोबर द्राक्ष उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याने ते धास्तावले आहेत. मण्यांना तडे पडू लागल्याने उत्पादनाला फटका बसणार आहे. हरभरा पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हे पीक फुलोऱ्यात आहे. काही ठिकाणी घाटे लागले असून, पिकांची वाढ खुंटत आहे. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...

पिके वाचविण्यासाठी औषधांची फवारणी 
ढगाळ वातवरणामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पालक, गिलके, दोडके, मेथी या पिकांवर मावा रोगाने अतिक्रमण केल्याने पिके खराब झाली असून, औषध फवारणी करून शेतकरी हतबल झाले आहेत. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

ढगाळ व रोगट वातावरणामुळे चार-पाच दिवसांपासून रब्बी पिकांवर औषधे फवारणी करावी लागत असून, खर्चात वाढ झाली आहे. -राहुल शेलार, शेतकरी, जुनी शेमळी